‘हायब्रीड’वरून मानापमान नाट्य

By Admin | Published: February 22, 2016 12:35 AM2016-02-22T00:35:32+5:302016-02-22T00:35:32+5:30

देशातील पहिली हायब्रीड बस परिवहनच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी मानापमान नाट्याला सुरवात झाली आहे. ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात हायब्रीड बसच्या झालेल्या

A humorous drama from 'Hybrid' | ‘हायब्रीड’वरून मानापमान नाट्य

‘हायब्रीड’वरून मानापमान नाट्य

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
देशातील पहिली हायब्रीड बस परिवहनच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी मानापमान नाट्याला सुरवात झाली आहे. ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात हायब्रीड बसच्या झालेल्या लोकार्पणाशी परिवहनचा संबंध नसल्याचे परिवहन सभापती साबू डॅनिअल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिवहनतर्फे स्वतंत्र कार्यक्रम घेवून हायब्रीड बसचे लोकार्पण केले जाणार आहे.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने काही महिन्यांपूर्वी व्होल्वो बस कंपनीकडून दोन हायब्रीड बसची मागणी केली होती. त्यानुसार जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात या बस परिवहनच्या उपक्रमात दाखल होण्याची शक्यता होती. सार्वजनिक वाहतूक सेवेवर भर देत त्यामध्ये सुधार घडवण्याच्या उद्देशाने परिवहनने हा निर्णय घेतलेला आहे. बॅटरी व डिझेलवर चालणारी ही बस आहे. पूर्णपणे स्वीडन तंत्रज्ञानाचा वापर करुन ही बस बनवण्यात आलेली आहे. प्रवाशांना आरामदायी तसेच पर्यावरणपूरक अशा या हायब्रीड बस आहेत. सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या या हायब्रीड बस खरेदीसाठी केंद्रीय जड व अवजड उद्योग मंत्रालयाचेही आर्थिक सहकार्य लाभलेले आहे. त्यानुसार मेक इन इंडिया कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेल यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बसची प्रतीकात्मक चावी सुपूर्द करण्यात आली. त्यामध्ये ठाणे महापालिकेचाही समावेश आहे. यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महापालिकेचा व्होल्वो बस कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार करण्यात आला. परंतु या लोकार्पण सोहळ्याचा परिवहनशी कसलाही संबंध नसल्याचे सभापती साबू डॅनिअल यांनी सांगितले आहे. तसेच हायब्रीड बसची जी चावी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली ती स्वीकारली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय हायब्रीड बस लोकार्पणाचा परिवहनचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. परंतु झालेला कार्यक्रम हा महापालिकेचा नव्हता, तर शासनाचा होता. त्यामध्ये महापौर व इतरांनाही निमंत्रित केलेले होते असे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
व्होल्वोच्या हायब्रीड बसला अद्याप एआरआय (आॅटोमिक रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया) ची परवानगी मिळालेली नाही. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच बस परिवहनकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. मात्र व्होल्वो कंपनीने मेक इन इंडिया कार्यक्रमात संधी साधत स्वीडनच्या पंतप्रधानांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे चावी सुपूर्द करुन लोकार्पणाचा कार्यक्रम उरकला. या कार्यक्रमाला फक्त पालिका आयुक्तांची उपस्थिती सत्ताधाऱ्यांना खटकल्यानेच त्यांच्यात हे नाट्य सुरु असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्ताधाऱ्यांची नाराजी
सत्ताधाऱ्यांच्या मालमत्ताकर व पाणीदर न वाढवण्याच्या भूमिकेला पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अनेकदा त्यांच्या विधानातून छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांची आयुक्तांप्रति नाराजी असतानाच हायब्रीडचे मानापमान नाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: A humorous drama from 'Hybrid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.