शाब्दिक कोट्यांचा विनोदी अवतार!
By admin | Published: January 24, 2017 06:22 AM2017-01-24T06:22:11+5:302017-01-24T06:22:11+5:30
एखाद्या नाटकाच्या शीर्षकावरून थोडाफार अंदाज बांधता येत असला, तरी नाटकात तसे काही असेलच याची खात्री देता येत नाही.
एखाद्या नाटकाच्या शीर्षकावरून थोडाफार अंदाज बांधता येत असला, तरी नाटकात तसे काही असेलच याची खात्री देता येत नाही. अनेकदा नाटकाच्या शीर्षकात आणि रंगमंचावर सादर होणाऱ्या कलाकृतीत बरेच अंतर असते. त्याचप्रमाणे, ‘कन्हैया’ या शब्दावरून मनात जे चित्र उभे राहते; त्यापासून हे नाटक दूर आहे. अर्थात, अंदाज वर्तवण्यात गडबड झाली तरी अशा चुकवाचुकवीमुळे त्यातली उत्सुकता मात्र ताणली जाते.
आता प्रश्न पडतो की या नाटकाचे शीर्षक ‘कन्हैया’ असे का, तर त्याचे उत्तर मिळवण्यासाठी या नाटकाचा प्रयोग पाहणेच योग्य ठरेल. जरी या नाटकाचे ‘कन्हैया’ असे एकशब्दी शीर्षक असल्याचे भासत असले, तरी ते खरे ‘सूटबूट में आया कन्हैया बॅण्ड बजाने को’ असे लांबलचक आहे म्हटल्यावर भांबावल्यासारखे होणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळे हे नाटक विनोदाच्या वळणाने जाणार याचे सूचन होत राहते. त्यानुसार, या नाटकाने विनोदी बाज पकडला आहे खरा; परंतु केवळ शाब्दिक कोट्यांपर्यंत तो मर्यादित राहतो आणि या अवताराचा परीघ अजून विस्तारता आला असता असे जाणवते.
एक नवपरिणीत जोडपे आदिवासींच्या कचाट्यात, अशी या नाटकाची ‘वनलाइन स्टोरी’ आहे असे म्हणता येईल. अशी सिद्धता झाल्यावर मग नाट्याचे अवकाश विस्तृत होण्यासाठी जी काही कमाल पेरणी करावी लागेल ती या नाटकात लेखक समीर सुर्वे यांनी केली आहे. मग मुख्य पात्रांच्या जोडीला त्यांचे नातलग आणि जंगलात घडणारे नाट्य असल्याने तिथल्या आदिवासींची टोळी हेसुद्धा त्याबरोबर येते. शहर आणि जंगल यांच्यातला व्यक्तिनिहाय सामना जसा यात दिसतो; तसेच विनोदाच्या माध्यमातून यातले नाट्य उंचावण्याचा केलेला प्रयत्नही स्पष्ट होतो. आदिवासींच्या संदर्भाने होणाऱ्या गमतीजमती आणि त्यांच्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या शहरी माणसांची गडबड यावर यात विनोदाच्या अंगाने फोकस टाकला आहे. तरीही या विषयाला अजून डूब देता आली असती असे वाटत राहते.
मूळचा अभिनेता असलेल्या भूषण कडू याने हे नाटक दिग्दर्शित केले आहे. संहितेतल्या जागा भरण्याचे काम करत त्याने हे नाट्य उभे केले असले, तरी त्याला लाफ्टर-शोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कलावंतांनी सरळ रेषेत उभी राहून केलेली संवादी आतशबाजी रंगमंचाचा सुयोग्य उपयोग करून घेण्याशी फटकून वागते. आदिवासींच्या प्रवेशातले विविध आकृतिबंध मात्र त्याने नीट बांधले आहेत.
कलावंतांनी मात्र संहितेनुरूप या नाटकाचा स्तर उंचावण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या अचूक टायमिंग-सेन्स यामुळे नाटकाचा तोल सांभाळला गेला आहे. अंकुर वाढवे, भूषण कडू, भूषण घाडी, पृथ्विक कांबळे, अमित चव्हाण, शिवाजी रेडेकर, नितीन जाधव, समीर काळवे, अनिकेत वाडेकर, मकरंद नवघरे, पद्मश्री मेस्त्री, कीर्ती सावंत, कोमल नर,
रूपाली गायखे, सुवेधा देसाई ही युवा कलावंतांची टीम या नाटकात सुसाट सुटली आहे.
अंकुश कांबळी यांचे धबधब्याचे नेपथ्य आकर्षणाचा भाग आहे; तर भूषण देसाई यांची प्रकाशयोजना उठावदार आहे. वेषभूषा आणि रंगभूषेने महत्त्वाचा वाटा या नाटकात उचलला आहे. एकूणच, डोक्याला कोणतेही प्रश्न पडू न देता या नाटकाचा आस्वाद घेण्याचे ठरवल्यास मात्र हे नाटक दोन घटका करमणूक करणारे ठरू शकेल.