शंभर पुरुष एकत्र राहू शकतात; पण दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, हा समज खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:16+5:302021-03-13T04:10:16+5:30
मुंबई : स्त्री हीच स्त्रीची पहिल्या क्रमांकाची वैरी असते, दुष्मन असते. शंभर पुरुष एकत्र राहू शकतात; परंतु दोन महिला ...
मुंबई : स्त्री हीच स्त्रीची पहिल्या क्रमांकाची वैरी असते, दुष्मन असते. शंभर पुरुष एकत्र राहू शकतात; परंतु दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, असा आज सर्वत्र समज - गैरसमज निर्माण झाला आहे. हा समज खोटा ठरवून महिला एकत्र राहू शकतात हे जगाला दाखवून दिले पाहिजे, अशा परखड शब्दांत राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखा बोऱ्हाडे यांनी समस्त समाजाची कानउघाडणी केली. रोहिणी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर महिला मंडळाच्या ३१व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रेखा बोऱ्हाडे या विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होत्या.
रेखा बोऱ्हाडे पुढे म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त प्रथम सगळ्या महिलांना सलाम! आजकाल आपण सगळेच दिन साजरे करू लागलो आहोत. त्यातच हा महिला दिन. परंतु महिला दिन साजरा करायचा असेल तर मला असे वाटते की प्रत्येक स्त्रीने हातात हात घालून सगळ्यांनी एकत्र जायला हवे. एखादी स्त्री तिच्या कर्तृत्वावर पुढे जात असेल तर तिची स्तुती करावी, तिला प्रोत्साहन द्यावे. पण, महिलांना सवय असते की एका महिलेची पाठ फिरली की लगेच तिची कुचेष्टा करायची. एक महिलाच महिलेची शत्रू होते. तेंव्हा या गोष्टी खोडून काढायच्या असतील तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.