Join us

शंभर मिनिटे विमानाच्या वॉशरूममध्येच, लँडिंगनंतर सुटका, मुंबई-बंगळुरू विमानातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 5:41 AM

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हा प्रवासी विमानाच्या बाथरूममध्ये गेला.

मुंबई : स्पाईसजेटच्या विमानाने मुंबईतून बंगळुरूला निघालेला एक प्रवासी प्रवासादरम्यान तब्बल १०० मिनिटे विमानाच्या बाथरूममध्येच कोंडला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बंगळुरू येथे विमान उतरले त्यानंतर विमान कंपनीचा इंजिनीअर विमानात आला आणि त्याने दरवाजा उघडल्यावर प्रवाशाची सुटका झाली आहे.     

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हा प्रवासी विमानाच्या बाथरूममध्ये गेला. बाहेर येतेवेळी बराचवेळ प्रयत्न करूनही त्याला बाथरूमचा दरवाजा उघडता आला नाही. अखेर त्याने दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. त्यावेळी केबिन कर्मचाऱ्यांनी बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले.

या बचावकार्यादरम्यान लँडिंगची वेळ झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एका कागदावर घाबरू नका, आपण थोड्याच वेळात लँडिंग करत आहोत, बाथरूममधील सीटवर बसून राहा, असा मजकूर लिहिला आणि कागद दरवाजाच्या गॅपमधून प्रवाशाला दिला. दरम्यान, विमान लँडिंग झाल्यावर इंजिनिअरने त्याची सुटका केली. विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त करत त्याला तिकिटाचे संपूर्ण पैसे परत दिले.

टॅग्स :स्पाइस जेटविमान