हजमधील नोकरीच्या नावे २०० तरुणांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:42 AM2017-08-11T06:42:14+5:302017-08-11T06:42:14+5:30

नौदलाचा डॉक्टर, सीबीआय कर्मचारी, तसेच दक्षिण पूर्वमधील अब्जाधीश असल्याचे सांगून तरुणांना गंडा घालणाऱ्या ठगाला आर.ए.के. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

 Hundreds of 200 youths in Hajj jobs | हजमधील नोकरीच्या नावे २०० तरुणांना गंडा

हजमधील नोकरीच्या नावे २०० तरुणांना गंडा

Next

मनीषा म्हात्रे 
मुंबई : नौदलाचा डॉक्टर, सीबीआय कर्मचारी, तसेच दक्षिण पूर्वमधील अब्जाधीश असल्याचे सांगून तरुणांना गंडा घालणाऱ्या ठगाला आर.ए.के. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हजमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने २००हून अधिक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अब्दुल सलम अब्दुल रशीद (५३) असे त्याचे नाव आहे. बंगळूर विमानतळावरून दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे.
शिवडी परिसरात भाड्याने राहत असलेल्या रशीदने हजारो तरुणांना चुना लावल्याचा संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत फक्त २०० तरुण समोर आले आहेत. रशीदने पोलिसांना दिलेल्या माहितीत, सीबीआयमध्ये पाच वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नेव्हीत डॉक्टर म्हणून नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच दक्षिण पूर्व भागात त्याचे बंगले व जमिनी असल्याचाही दावा केला आहे. त्याने याबाबत तेथील काही फोटोजही पोलिसांना दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणातील तक्रारदार शबिरा अब्दुल गनी अगा याने दिलेल्या माहितीनुसार, रशीद अलीकडेच त्याच्या घराजवळ भाड्याने राहण्यास आला होता. तो घरात एकटा असल्याने त्याला ईदला जेवायला घरी बोलावले. तेव्हा त्याने त्याच्या दक्षिण पूर्व शहरातील मालमत्तेची माहिती दिली. तसेच आतापर्यंत त्याने सौदी अरेबियात अनेकांना नोकरी लावून दिल्याचेही सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अगानेही त्याला नोकरीस लावण्यास सांगितले.
रशीदने त्याला हजमध्ये सेवेच्या नावाखाली ३५ हजार पगाराची नोकरी तसेच २ ते ३ लाख बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे त्याच्यासह आणखीन ३५ जणांनी नोकरीसाठी तयारी दर्शविली. तेव्हा रशीदने पासपोर्ट, व्हिसासाठी तसेच अन्य कागदोपत्री व्यवहारासाठी प्रत्येकी २० हजार रुपये घेतले. २४ जुलै रोजी तो सामान बांधून येथून निघाला. निघताना काम झाल्याचे सांगून लवकरच येत असल्याचे सांगितले. मात्र तो परतलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

२०० पासपोर्ट जप्त
रशीदच्या शिवडीतील फ्लॅटमधून दोनशेहून अधिक पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याने ४० लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली. केरळसह त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी त्याचा ताबा केरळ पोलिसांनी घेतला.

Web Title:  Hundreds of 200 youths in Hajj jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.