शेकडो एकर जमीन हडपणारा भूमाफिया गजाआड

By admin | Published: October 26, 2016 01:57 AM2016-10-26T01:57:17+5:302016-10-26T01:57:17+5:30

चंदनबाई निगनदास शहा मालकिणीला देवदर्शनाला नेण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशात नेऊन तिला मृत दाखवून तिची शेकडो एकर जमीन स्वत:च्या नावावर करुन पसार झालेल्या

Hundreds of acres of land | शेकडो एकर जमीन हडपणारा भूमाफिया गजाआड

शेकडो एकर जमीन हडपणारा भूमाफिया गजाआड

Next

ठाणे : चंदनबाई निगनदास शहा मालकिणीला देवदर्शनाला नेण्याच्या नावाखाली मध्यप्रदेशात नेऊन तिला मृत दाखवून तिची शेकडो एकर जमीन स्वत:च्या नावावर करुन पसार झालेल्या नथमल रेखचंद संचेती (६१) भूमाफियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेच्या मार्गामध्ये करोडो रुपये किंमतीच्या ५५० एकर जमिनीला सोन्याचा भाव आल्याने २५ वर्षापूर्वी घडलेल्या मृत्यू प्रकरणाचाही सखोल तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नथमल याने १० नोव्हेंबर १९९० रोजी मृत्यू पावलेल्या चंदनबाई यांचे मृत्यूपत्र त्यांच्या मृत्यूच्या पाचच दिवस आधी म्हणजे ५ नोव्हेंबर १९९० रोजी बनविले होते. विशेष म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत असूनही मृत्यूपत्रावर त्यांचा अंगठा घेतला होता. त्यामुळे या सर्व बाबीच संशयास्पद असल्याचे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे. त्यांचे पती आणि मुलाचा त्यांच्या मृत्युपूर्वीच मृत्यू झाल्याने तसे जवळचे वारसदार नसले तरी चंपकलाल शहा यांच्यासह इतर नातेवाईकांनी या सर्व बाबींवर संशय व्यक्त करुन याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ५ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. त्यांनी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. त्यानंतर बुरडे यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात १७ मे २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला. यानंतर पसार झालेल्या नथमल याला २३ आॅक्टोबर रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात वास्तव्यास असलेल्या चंदनबाई यांच्याकडे घरगडी म्हणून नथमल कामाला होता. चंदनबार्इंच्या पतीच्या निधनानंतर त्या टेंभीनाका येथे एकटयाच वास्तव्याला होत्या. सुमारे ५० पेक्षा जास्त कुटूंब संख्या असलेल्या शहा कुटुंबियांची शहापूर परिसरात शेकडो एकर जागा आहे. पती निधनानंतर सर्व जमीन चंदनबार्इंच्या नावे झाली. त्यासाठी दरवर्षी शेतसारा त्या भरत असत. घरगडी म्हणून काम करणाऱ्या नथमलने त्यांचा विश्वास संपादन केल्याने त्याला शहा कुटूंबियांच्या सर्व मालमत्तेची माहिती होती. १९९० मध्ये अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या चंदनबाईना नथमलने तीर्थयात्रेला आणि हवापालट करण्याचे सांगून त्याच्या मध्यप्रदेशातील खेतीया या गावी नेले. त्यानंतर तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सर्वांना त्याने सांगितले. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्यालालाच वारस म्हणून दाखविल्याचा दावाही करून त्यांनीच सर्व मालमत्ता आणि जमीन आपल्या नावावर केल्याचे जाहीर केले होते.
चंदनाबार्इंच्या नावे जमिनीचे परस्पर व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे याना भेटून चौकशीची मागणी केली. ५ सप्टेंबर २०१६ रोजी शिंदे यांनी शहा कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यानी बुरडे यांना चौकशीचे आदेश दिले. बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत कदम आणि निरीक्षक महेश शेट्ये यांच्या पथकाने तपास केला. नथमल त्याच्याविरूद्ध फसवणुकीसह सहकारी नोंदणी कायद्यानुसार कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)

वारस असल्याचे भासविले
चंदनाबाईचा मृत्यू १० नोव्हेंबर १९९० मध्ये मोरतलई (मध्यप्रदेश) येथे झाला. मात्र, त्यांचे मृत्यूपत्र (वसियतनामा) मृत्यूच्या पाच दिवस आधी ५ नोव्हेंबर रोजी झाल्याचे दाखवून त्याच दिवशी त्याची कागदपत्रे मुरबाड तहसील कार्यालयात संचेतीने पाठविली. आपणच चंदनाबाई यांच्या जमिनीचे वारस असल्याचे दाखवून त्याने आपल्या नावावर जमिन बळकावली. त्या सुशिक्षित होत्या. त्यांना स्वाक्षरी करता येत होती.
शासकीय व्यवहारही त्या मराठीतून करायच्या. असे असताना वसियतनामा हिंदीत टाईप केलेला दाखविला आहे. त्यांच्या अंगठ्याचे ठसे सही म्हणून दाखविण्यात आले. मोरतलई येथे त्यांचा मृत्यू झालेला असतांनाही तशी नोंद तेथील ग्रामपंचायतीकडे नाही. सरपंचांनीही तसा लेखी अभिप्राय दिलेला असताना त्यांच्या मृत्यूचा दाखला नथमलने कोठून मिळविला, असा सवाल चंदनाबाईचे नातेवाईक शिरीष शहा यानी केला आहे.
१० नोव्हेंबर १९९० रोजी तिचा मृत्यू दाखविलेला असतानाही सहा वर्षानी ९ आॅगस्ट १९९६ रोजी चंदनाबाईंच्या नावे ठाणे येथील युनियन बँक आॅफ इंडियात कसे खाते उघडण्यात आले, असा सवालही शहा कुटूंबियांनी उपस्थित
केला आहे.

Web Title: Hundreds of acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.