जनधन योजनेपासून शेकडो कुटुंबे वंचित
By Admin | Published: February 27, 2015 10:40 PM2015-02-27T22:40:22+5:302015-02-27T22:40:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बँक खात्यापासून आजही कसाऱ्यासह अन्य गावापाड्यांतील
कसारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बँक खात्यापासून आजही कसाऱ्यासह अन्य गावापाड्यांतील नागरिक वंचित आहेत़ स्थानिक बँकेतून या योजनेचे फॉर्म देणे बंद झाल्याने हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
गोरगरिबांसाठी उपयुक्त असलेल्या या योजनेमार्फत सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याने शहरी भागात बँकांनी प्रचार करून फॉर्म भरून बँक खाते उघडून घेतले. परंतु, येथील एकमेव बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाने कसाऱ्यासह संलग्न असलेल्या १९ गावपाड्यांत जनधन योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची जनजागृती न केल्याने संपूर्ण आदिवासी व अतिदुर्गम भाग असलेल्या कसाऱ्यासह सुसरवाडी, वाशाळा, ढाकणे, चिंघ्याचीवाडी, राड्याचापाडा यासह अन्य १२ पाड्यांतील आदिवासी या योजनेपासून वंचित आहेत.
यासंदर्भात अनेकांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाशी संपर्क केला. परंतु, योजना बंद झाल्याचे सांगून स्थानिक कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची हेळसांड करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (वार्ताहर)