विमानतळावर पकडले दीड कोटीचे सोने
By admin | Published: December 8, 2015 02:32 AM2015-12-08T02:32:18+5:302015-12-08T02:32:18+5:30
पॅरिस येथून मुंबईत आलेल्या राज जाधव या प्रवाशाकडून सुमारे १ कोटी ६१ लाख रुपये मूल्याच्या सोन्याची तस्करी पकडण्यात कस्टम्स विभागाला यश आले आहे.
मुंबई : पॅरिस येथून मुंबईत आलेल्या राज जाधव या प्रवाशाकडून सुमारे १ कोटी ६१ लाख रुपये मूल्याच्या
सोन्याची तस्करी पकडण्यात कस्टम्स विभागाला यश आले आहे. आखाती देशातून सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण अधिक आहे, मात्र पॅरिसवरून आलेल्या प्रवाशाकडून एवढा साठा हस्तगत झाल्याने कस्टम विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख व कस्टमचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, राज जाधव ही व्यक्ती लंडन येथून पॅरिस व तेथून मुंबईला आली. या व्यक्तीकडे प्रत्येकी एक किलो वजनाचे सोन्याचे सात बार होते. यापैकी सोन्याचे चार बार हे त्याने आपल्या बुटाच्या तळाशी तर तीन बार अंतर्वस्त्रामध्ये दडविले होते. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालाचालीमुळे कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला व त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता ही तस्करी उजेडात आली. जाधव याला अटक करण्यात आली असून, त्याने या तस्करीत हस्तक असल्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)