Join us

रेल्वेमार्गावर पंधरवड्यात मृत्यूची शंभरी पार

By admin | Published: June 22, 2017 5:41 AM

मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ मानली गेलेली उपनगरीय रेल्वे सेवा ‘डेथलाइन’ बनू पाहत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर १५ दिवसांत ११२ प्रवाशांचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ मानली गेलेली उपनगरीय रेल्वे सेवा ‘डेथलाइन’ बनू पाहत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर १५ दिवसांत ११२ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिलेल्या आकेडवारीवरून समोर आली. धावती लोकल पकडणे, दरवाज्यात उभे राहणे, रूळ ओलांडणे ही प्रवाशांच्या मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेल्वे अपघातांत ७ ते २१ जूनदरम्यान सर्वाधिक प्रवासी अपघात ठाणे स्थानकांवर झाले आहेत. सुमारे १० लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या या स्थानकात १४ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ११ प्रवाशांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात सर्वाधिक ८ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. तर पश्चिम मार्गाच्या वसई रोड स्थानकात गेल्या पंधरवड्यात ७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात ८ जूनच्या गुरुवारी तिन्ही लोकल मार्गांवर १३ जणांना प्राण गमवावे लागले. तर १५ जूनच्या गुरुवारी सर्वांत कमी अपघात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या वतीने वारंवार विविध उपक्रम हाती घेतले जातात. बहुतांशी अपघात लोकलमधील गर्दीमुळे होतात. परिणामी, गर्दीच्या वेळी धावती लोकल पकडू नये, दरवाज्यात उभे राहू नये अशा उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहेत. तसेच रेल्वे पोलिसांकडूनही प्रवासी सुरक्षिततेसाठी विशेष मोहिमेंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.अति घाई... रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस यांच्याकडून संयुक्त आणि स्वतंत्र विविध प्रवासी सुरक्षा उपक्रम राबवण्यात येतात. त्याच बरोबर व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक यासारख्यां सोशल मिडियामधूनही सुरक्षिततेच्या ‘पोस्ट’ आणि ‘व्हीडिओ’ व्हायरल करण्यात येतात. मात्र प्रवाशांना असलेली ‘घाई’ प्रवासी मृत्यूचे कारण बनत असल्याचे रेल्वे पोलिस सूत्रांनी सांगितले.