- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : तालुक्यातील खैरणे येथील एका कामगाराने पन्नास लाख रुपयांसाठी आपल्याच मालकाच्या दीड वर्षाच्या नातीला सोमवारी पहाटे ३ वाजण्याचा सुमारास घरातून पळवून नेले. सकाळी जाग आल्यावर घरच्यांनी चिमुरडीचा शोध घेतला असता मुलगी कुठेच न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अवघ्या आठ ते दहा तासांत एका आरोपीला अटक केली. सकाळी ८ वाजता पन्नास लाख रुपयांची मागणी करणारा फोन आल्यावर चिमुरडीचे अपहरण झाल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्तांसह किमान डझनभर उच्च पदस्थ अधिकारी गावात दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. हरिश्चंद्र हशा म्हात्रे हे कंत्राटी ठेकेदार आहेत. चुलते आणि ते एकाच घरात राहतात. म्हात्रे यांचा पुतण्या सुजित धर्मा म्हात्रे यांची दीड वर्षाची मुलगी चुलत आजोबा आळंदीहून आल्याने त्यांच्यासोबतच घरासमोरच्या खोलीत झोपली. त्यानंतर ती गायब झाली. मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच खंडणी पथक, विशेष गुन्हे शाखा आणि पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीला पळवून नेताना सुजित म्हात्रे यांच्या भावाच्या मोबाइलमधील दोन सीम कार्ड आरोपीने काढून नेले होते. त्यावरून फोन करून त्याने पन्नास लाखांची मागणी केली होती. सकाळपासून दुपारपर्यंत त्यांनी दोन फोन केले. दरम्यान, पन्नास लाखांची मागणी केल्यानंतर सुजित म्हात्रे यांनी पैशाची सोय करून फोन करतो, असे आश्वासन अपहरणकर्त्यांना दिले होते. पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रेस केले आणि प्रकरण उघडकीस आले. अपहृत मुलगी सुखरूप आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.