छबिना उत्सवात लाखो भक्तांची हजेरी

By admin | Published: February 19, 2015 11:00 PM2015-02-19T23:00:34+5:302015-02-19T23:00:34+5:30

कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव आज पारंपरिक पद्धतीने व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.

Hundreds of millions of devotees attend the festival | छबिना उत्सवात लाखो भक्तांची हजेरी

छबिना उत्सवात लाखो भक्तांची हजेरी

Next

संदीप जाधव ल्ल महाड
कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव आज पारंपरिक पद्धतीने व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्रीपासून या छबिना उत्सवाला प्रारंभ होतो. यानिमित्त मंदिर परिसरात भरणाऱ्या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात. छबिना उत्सवानिमित्त श्री विरेश्वर देवस्थानबाबत घेतलेला आढावा.
नावामागील इतिहास
राम व लक्ष्मण वनवासात असताना राक्षसांशी लढताना त्यांनी आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्ती पार्वतीने महिकावती देवीच्या रुपाने अवतरुन त्यांची मारुतीच्या सहाय्याने सुटका केली. या देवीच्या नावावरून या शहराला महाड असे नाव पडले. आजही महाडच्या पश्चिमेस सावित्री व गांधारी नदीच्या संगमावर भग्नावस्थेतील महिवंतीकेच्या पुरातन मंदिराचे अवशेष अस्तित्वात असल्याचे पहायला मिळतात. शिवपुराण व श्री हरिहरेश्वर पुराण यामध्ये सावित्रीच्या तीरावर शंकर गुप्त रुपाने राहत असल्याचा उल्लेख आहे. हे स्थान म्हणजेच श्री विरेश्वर महाराज!
शिवाजी महाराज विरेश्वर भक्त
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आपली राजधानी म्हणून निश्चित केली त्यावेळी ते महाडच्या या विरेश्वर महाराजांच्या दर्शनाला आलेले होते. मोहिमेवर निघण्यापूर्वी ते विरेश्वराचे दर्शन घेवूनच जात असत.
रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ३० मण रत्नजडित सोन्याचे सिंहासन तयार करण्याची जबाबदारी रामाजी दत्ता चित्रे या महाराजांच्या विश्वासू सहकाऱ्यावर सोपवली होती. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे हे सिंहासन तयार झाल्यावर ते रायगडावर नेण्यात आले. सिंहासन बनवताना सोन्याचा अपहार झाल्याचा संशय काही धूर्त लोकांनी शिवाजी महाराजांकडे व्यक्त केला. चित्रे यांनी आपल्यावरील आरोपात काहीही तथ्य नसल्याचे महाराजांना सांगितले. त्यासाठी आपण कुठलेही दिव्य करण्यासाठी तयार असल्याचे रामाजी चित्रे यांनी महाराजांना सांगितले.
शिवाजी महाराज महाडला श्री विरेश्वरच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामाजी चित्रे होतेच. मंदिरासमोरच कढईमधील उकळत्या तेलात सोन्याचे नाणे टाकून ते नाणे रामाजींना हाताने उचलण्यास महाराजांनी सांगितले. रामाजींनीही महाराजांच्या आदेशानुसार श्री विरेश्वराला मनोभावे नमस्कार करून उकळत्या तेलातून ते नाणे हाताने बाहेर काढून दाखवले व रामाजी दोषमुक्त झाले. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांसमोर महाराजांनी विश्वासू रामजींना मिठी मारली.
विरेश्वर मंदिराची बांधणी पेशवे काळात झाली. त्यावेळी रायगडचे सुभेदार यशवंत पोतनीस होते. रायगडापासून बाणकोटपर्यंतचा प्रदेश पोतनीसांच्या ताफ्यात होता. १६६५ मध्ये पुरंदरचा किल्ला मोठ्या शौर्याने लढलेल्या मुरारबाजी देशपांडे यांचे पोतनीस हे वंशज. शिवाजी महाराजांच्या काळात पोतनीस हा त्यांना हुद्दा मिळाला होता. त्यांनी बांधलेले हे विरेश्वर मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे.
छबिना उत्सव काळातील शेकडो वर्षांची परंपरा असलेला देवभोजन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यासाठी पंचपक्वान्नांचा नैवेद्य देवांसाठी ठेवला जातो. मध्यभागी श्री विरेश्वर महाराज व पार्वतीचे पान तसेच जाखमाता, कोटेश्वरी देवी व एका बाजूस श्रीगणेश, विष्णू अशी पाने वाढून ठेवलेली असतात. आरती झाल्यानंतर सर्व देवांनी भोजनाला येण्याचे आवहन केले जाते. त्यानंतर सर्व भक्तांना बाहेर जावू दिल्यानंतर, मंदिराचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद केले जातात. याचवेळी दुसऱ्या बाजूस पोतनीसांच्या कोठीमध्ये (सध्या सभागृह असलेल्या ठिकाणी) ब्राम्हणभोजन सुरू केले जाते. काही वेळानंतर मंदिराचे देवभोजनासाठी लावण्यात आलेले सर्व दरवाजे उघडण्यात येतात. त्याचवेळी देवभोजन पाहण्यासाठी भाविक एकच गर्दी करतात. भाताच्या मुदीवर हाताच्या बोटाचे ठसे उमटलेले, वरण भातावर आलेले, लाडू फुटलेले, पिळलेले लिंबू, फोडलेली करंजी आदि स्वरूपात देव जेवल्याची प्रचिती भाविकांना येते.
छबिन्याच्या दिवशी महाडच्या आजूबाजूच्या गावच्या ग्रामदेवता पालखीने श्री विरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी वाजतगाजत आणल्या जातात. सर्वात मानाची पालखी विन्हेरची झोलाईदेवी, सर्वात शेवटी मध्यरात्री झोलाईदेवीचे आगमन मोठ्या थाटामाटात केले जाते. महाड शहरात भोईघाट येथे झोलाईदेवीच विरेश्वर मंदिरात नेतात. विरेश्वर मंदिरात झोलाईदेवीचे आगमन झाल्यानंतर विधिवत गोंधळ घातला जातो. त्यानंतर सर्व पालख्यांसह विरेश्वराची मिरवणूक काढण्यात येते. गाडीतळ परिसरात मध्यरात्रीच्या वेळी उसळलेल्या प्रचंड जनसागराच्या साक्षीने ६० ते ७० फूट उंचीच्या उत्सव काठ्या, नगारा आणि खालूच्या ठेक्यावर भाविक नाचतात. हे दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते. हातात पेटते काकडे घेवून मोठ्या भक्तिभावाने ते नाचवले जातात. यानिमित्त भरलेल्या यात्रेला लाखो भक्तगण उपस्थिती लावतात. दिवसेंदिवस या छबिना उत्सवाची व्याप्ती वाढतच आहे. पालख्या नाचवल्यानंतर पहाटेपर्यंत छबिना उत्सवाची सांगता होते.

वीरांचा देव ‘विरेश्वर’
च्देवस्थानला विरेश्वर हे नाव कसे पडले त्याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी हजारो वर्षांपूर्वी गंधार पाली यांच्या राजवटीपूर्वीही हा परिसर लढाया आणि लढवय्या वीर पुरुषांचा म्हणून गणला जात असे. जलमार्ग आणि भूमार्ग या ठिकाणी अस्तित्वात असल्यामुळे हे ठिकाण मध्यवर्ती म्हणून समजले जात असे. स्वयंभू देवस्थानचे दर्शन घेतले की मोहीम यशस्वी व्हायचीच.

 

Web Title: Hundreds of millions of devotees attend the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.