Join us

मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळले; मायक्रोसॉफ्टमुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 5:43 AM

मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीत बिघाड निर्माण झाल्याने देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या.

मुंबई : मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीत झालेल्या बिघाडाचा फटका देशातील विमान प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसला. मुंबई व दिल्लीसह देशातील तब्बल २०० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण यामुळे रद्द झाले असून इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस अशा सर्वच विमान कंपन्यांच्या प्रवाशांचे हाल झाले. यात मुंबई विमानतळावरून ७५ हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीत बिघाड निर्माण झाल्याने देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. अनेक विमानांची उड्डाणे त्यामुळे रद्द झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी विमानतळाच्या लॉबीतच बसकण मारली. अनेक तास विमानांचे उड्डाण नसल्याने हजारो प्रवाशांना ताटकळावे लागले होते. रात्री उशिरापर्यंत गोंधळाचे वातावरण होते.

त्याच प्रवाशांना प्रवेशासाठी प्राधान्य

nगर्दी वाढल्यामुळे दुपारनंतर ज्या विमान उड्डाणाला दोन तासांचा अवधी होता, त्याच प्रवाशांना प्राधान्याने विमानतळावर प्रवेश देण्यात आला. त्यामुळे विमानतळाबाहेरील परिसरात देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली.

nया समस्येमुळे सर्वच विमान कंपन्यांनी प्रवाशांकरिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या. संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्यामुळे विमान तिकिटांचे आरक्षण, रिफंड किंवा अन्य कोणताही क्लेम करणे शक्य नसल्याचे विमान कंपन्यांनी ग्राहकांना सोशल मीडियासह अन्य माध्यमांद्वारे कळवले.

टॅग्स :विमानमुंबई