Join us  

शिवसेनेला धमकीची शेकडो पत्र रोज येतात, स्टंटबाजी सोडा; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:14 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे.

मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. धमकीची अशी शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबई प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात एक धमकीचं पत्र आलं असून यात बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संबंधित पत्र त्यांच्या सुपूर्द केलं होतं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांना संबंधित विषयाची सविस्तर माहिती दिली होती. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन तुम्ही सुरू केलेलं आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला जीवानिशी मारलं जाईल आणि तुमच्या राज ठाकरेंनाही सोडणार नाही, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली होती. याच मुद्द्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी राज्यात ठाकरे सरकार असून इथं कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला. 

"महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे त्यामुळे इथं कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. अशा धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कुणाची काय हिंमत कुणाला हात लावायची. इथलं गृहखातं सक्षम असून प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे स्टंटबाजी सोडा महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

चंद्र-मंगळावर जाऊन हनुमान चालीसा म्हणा!राणा दाम्पत्य शिवसेनेच्या सभेच्याच दिवशी म्हणजे १४ मे रोजी नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेणार आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी नवी दिल्ली काय? तुम्ही चंद्र, मंगळ आणि इतर कुठल्या ग्रहावर जाऊनही हनुमान चालीसा म्हणू शकता. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही. पण कायदा-सुव्यवस्था राखणं हे गृहखात्याचं काम आहे आणि ते त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत असतात, असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतमनसेराज ठाकरे