मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाची शंभरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:07 PM2020-08-15T17:07:57+5:302020-08-15T17:08:21+5:30
रविवारीदेखील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये विखुरलेल्या स्वरुपात मुसळधार पावसाची नोंद होईल.
मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबईत विखुरलेल्या स्वरुपाच्या पावसाची ७० ते १०० मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. हाच पाऊस ठाणे आणि नवी मुंबईत १०० ते १२० मिलीमीटर एवढा नोंदविण्यात आला आहे. रविवारीदेखील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये विखुरलेल्या स्वरुपात मुसळधार पावसाची नोंद होईल. दक्षिण कोकणासह घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल. आणि पुढील दोन एक दिवस पाऊस मुंबईत लागून राहिल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शनिवारी मुंबईत ब-यापैकी ऊनं पावसाचा खेळ रंगला. सकाळी रिमझिम सुरु असणारा पाऊस दुपारी मात्र बेपत्ता झाला. आणि दुपारी काही वेगाने वारे वाहू लागले. याच काळात मुंबईत बहुतांश ठिकाणी ऊनं पावसाचा खेळ रंगला. दुपारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा जोर पकडला. किंचित ठिकाणी कोसळलेल्या जलधारांनंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. मात्र मधल्या काळात पावसाची रिपरिप सुरुच होती. दरम्यानच्या काळात ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. १४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.