Join us

निविदेतच अडकला ५० कोटींचा हँकॉक

By admin | Published: April 20, 2016 5:38 AM

सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असलेला हँकॉक पूल पाडल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असलेला हँकॉक पूल पाडल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पूल त्वरित बांधण्याची मागणी स्थानिकांकडून होत असली, तरी त्याला विलंबच लागणार असल्याचे समोर आले आहे. हँकॉक पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात येणार असून, अजूनही त्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंत्यांकडून सांगण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हँकॉक पूल उभारण्यासाठी १५ महिन्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हँकॉक पूल त्वरित उभारण्यासाठी पालिका आणि रेल्वेकडून प्रयत्न सुरू असून, अनेक पर्याय शोधण्यात येत आहेत. मात्र, पूल बांधण्याचे काम पालिकेकडून केले जाणार आहे आणि त्यासाठी निविदा काढली जाईल. याबाबत मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) ओ. कोरी यांनी सांगितले की, पालिकेकडून हँकॉक पुलाची उभारणी केली जाईल. त्यासाठी साधारणपणे ५0 कोटी रुपये खर्च आहे व १५ महिन्यांत तो उभारण्यात येणार आहे. हँकॉक पूल उभारणीसाठी निविदा काढल्या जातील. मात्र, अजून निविदा प्रक्रिया सुरूच असल्याचे कोरी म्हणाले. या पुलासाठी खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. हँकॉक पूल त्वरित बांधण्यासाठी लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाची मदत रेल्वेकडून घेतली जाणार असल्याचे विचारताच, याविषयी रेल्वेकडून तरी अद्याप माहिती देण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. पूल बांधणे हे काम पालिकेचे असून, रेल्वे ट्रॅकवरील पूल पाडणे हे काम रेल्वे प्रशासनाचे आहे. त्यामुळे सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल आमच्याकडूनच उभारला जाईल आणि मशीद स्थानकाजवळील कर्नाक पूल हा रेल्वेकडूनच पाडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. रूळ ओलांडणाऱ्यांना धोकाहँकॉक पूल प्रत्यक्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. पूल तोडल्यामुळे स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेक जण रूळ ओलांडून जात आहेत. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. हँकॉक पूल पाडण्यापूर्वी स्थानिकांना रहदारीसाठी दुसरा पर्याय का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यासाठी आंदोलनही पुकारण्यात आले. (प्रतिनिधी)