लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवी मुंबईच्या शंकरनगर येथील सुमारे ४५० झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली. मात्र २००० सालापूर्वीचे सर्व पुरावे असतानाही कोणतीही नोटीस न देता महापालिकेने कारवाई केल्याचा आरोप करत झोपडपट्टीवासीयांनी गुरुवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. महापालिकेने पर्यायी घरे दिली नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र देवीपूजक (वाघरी) समाजाचे अध्यक्ष सुरेश नवाडिया यांनी दिला आहे.नवाडिया यांनी सांगितले की, रहिवाशांकडे रेशन कार्डपासून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आणि फोटोपास अशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आहेत. मात्र तरीही महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे रहिवाशांना भर पावसात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेने घरांसोबत रहिवाशांनी बांधलेल्या शौचालयांवरही कारवाई केली आहे. त्यामुळे सरकारच्या सर्वांसाठी घरे आणि शौचालय या मोहिमांना महापालिकेने हरताळ फासल्याचा आरोप नवाडिया यांनी केला आहे.
झोपडीधारकांचे आझाद मैदानात उपोषण
By admin | Published: July 08, 2017 6:13 AM