मनोहर कुंभेजकर मुंबई : वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या (सीडब्ल्यूसी) माध्यमातून मोफत रोटी-भाजी योजना रस्त्यावरील गरिबांची भूक भागवत आहे. योजनेला येथील डबेवाला विलास शिंदे यांची साथ मिळाली आहे. १४ डिसेंबरपासून रोज सायंकाळी अंधेरी आणि वर्सोवा परिसरातील रस्त्यावर राहणा-या बेघरांना १०० रोटी-भाजीच्या डब्यांचे वाटप करण्यात येते.वर्सोवा, सातबंगला येथील सागरकुटीरमध्ये राहणारे डबेवाले विलास शिंदे हे सकाळी ९ ते सायंकाळी ४पर्यंत लोखंडवाला ते वांद्रे पश्चिम पाली हिलपर्यंत २५ ग्राहकांना तर गेल्या १४ डिसेंबरपासून रोज सायंकाळी ६ वाजता अंधेरी आणि वर्सोवा परिसरातील रस्त्यावर राहणाºया गरिबांना १०० रोटी-भाजीच्या डब्यांचे वाटप करतात.या योजनेचे उद्घाटन सीडब्ल्यूसीच्या पटांगणावर नुकत्याच झालेल्या ३७व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सोहळ्यात अभिनेत्री श्रीदेवी हिने केले, अशी माहिती शाळेचे प्राचार्य व एकता मंच या अशासकीय संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांनी दिली. माझी आई के. क्लारा कौल हिने मला प्रेरणा दिल्यामुळे १९८१ साली वेसावे कोळीवाड्यात एका छोट्याशा खोलीत ७ विद्यार्थ्यांपासून मी शाळा सुरू केली होती. आज या शाळेचा वटवृक्ष झाला असून केजी ते पदवीपर्यंत येथे सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे माझ्या आईच्या जन्मदिनी १४ डिसेंबरला ही योजना चिल्ड्रन वेल्फेअर शाळेच्या माध्यमातून एकता मंच या अशासकीय संस्थेने सुरू केली, असे अजय कौल यांनी सांगितले.दरम्यान, या कार्यक्रमाला अभिनेता जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, रवी किशन, शिवाजी साटम, श्रेयस तळपदे, आयकर आयुक्त राकेश भास्कर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण काळे, आमदार भारती लव्हेकर, आमदार अमित साटम, के-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर, नगरसेविका प्रतिमा खोपडे, नगरसेविका रंजना पाटील, नगरसेवक रोहन राठोड, शाळेचे अॅक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद उपस्थित होते.
मोफत रोटी-भाजी योजना भागवतेय शेकडो बेघरांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:01 AM