Join us

मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना ज्यूस पाजला; तलवार उंचावत जल्लोष, शिवरायांचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 10:18 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री व मनोज जरांगे यांनी वंदन केले.

मुंबई - राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर, सकाळी ९ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले असून त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री व मनोज जरांगे यांनी वंदन केले. तर, दोघांनीही तलवार हाती घेऊन जल्लोष केला. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंलगप्रभात लोढा यांच्यासह अनेक नेत आणि सरकारचे अधिकारी वाशीत दाखल झाले आहेत. शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मराठा समाजाकडून पुष्पवृष्टी झाली. तसेच, मराठा समाजाकडून घोषणाबाजीही करण्यात येत असून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले होते. 

मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर मनोज जरांगेंनी सरकारच्या या निर्णयाबाबत मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर आपण आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली होती. समाजाला विचारून मी हा निर्णय घेतला आहे.  मी मराठा समाजाला मायबाप मानलं आहे, मी मुलगा म्हणून काम करतो, असं मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठे यश मिळाले आहे. 

सगेसोयरेसह मनोज जरांगेंच्या या मागण्या झाल्या मान्य

- नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

- राज्यभरात ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा आम्हाला द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.

- शिंदे समिती रद्द करायची नाही, ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सरकारने दोन महिने मुदत वाढवली. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

- सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही, अशी मनोज जरांगेंची मागणी होती, ती सरकारने मान्य केली.

- ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र १०० रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले.

- अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृहविभागाने पत्र द्यावे, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ती देखील मान्य करण्यात आली.

- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती केलीच, तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी मनोज जरांगेंनी यांनी केली होती. ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे.

- क्युरेटिव पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली.

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलएकनाथ शिंदेमराठामराठा आरक्षण