लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझी लढाई शेवटच्या श्वासापर्यंत असून मी उपोषण मागे घेणार नसल्याचे साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी शनिवारी सांगितले.
गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे प्रफुल फास्ट फूड्स या उपाहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दर महिना २ लाख रुपये भाडे आकारून ते काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात उचलेकार लक्ष्मण गायकवाड यांनी शुक्रवारपासून पत्नी आणि कामगारांसह उपोषण आंदोलन सुरू केले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशी त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.
लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले की, ही लढाई मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असून एक मराठी माणूस अन्यायाविरोधात कसा लढतो हे दाखवून देणार आहे. निर्माती एकता कपूर यांना सव्वाशे रुपये आकारले जातात, मग मी तर १०० रुपये फुटाप्रमाणे भाडे द्यायला तयार असतानादेखील ते चित्रपट प्रशासनाला मान्य नाही. माझा येथील दिवसाचा गल्ला जेमतेम दहा हजार असून दरमहा दोन लाख भाडे मी कसे देणार, असा सवाल त्यांनी केला. माझ्यासारख्या मराठी माणसाला रस्त्यावर आणून त्या ठिकाणी फूड मॉल बनविण्याचा चित्रपट प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
--–------------------–-----------–------------------