मुंबई; माझी लढाई शेवटच्या श्वासापर्यंत असून मी उपोषण मागे घेणार नसल्याचे साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यानी आज सांगितले.
गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे प्रफुल फास्ट फूडस या उपहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दर महिना 2 लाख रुपये भाडे आकारुन ते काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविरोधात उचलेकार लक्ष्मण गायकवाड यांनी काल पासून पत्नी आणि कामगारांसह उपोषण आंदोलन सुरु केले होते.आज दुसऱ्या दिवशी त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले असून त्यांची प्रकृती ढसाळत चालली आहे.
काल लोकमत ऑनलाईनवर सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर सोशल मीडियावर आणि राजकीय,साहित्यिक वर्तुळात व्हायरल झाले होते.
दरम्यान काल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.जर त्यांना न्याय मिळाला नाही तर भाजपा वेळप्रसंगी रस्तावर उतरुन त्यांना न्याय देईल अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.याप्रकरणी आपण स्थानिक आमदार सुनील प्रभू यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असून यातून मार्ग काढण्याचे सांगितले असे खासदार शेट्टी म्हणाले.
लक्ष्मण गायकवाड यानी सांगितले की, ही लढाई मी मझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असून एक मराठी माणूस अन्याया विरोधात कसा लढतो हे दाखवून देणार आहे. निर्माती एकता कपूर यांना सव्वाशे रुपये आकारले जातात तर मग मी तर 100 रुपये फूटा प्रमाणे भाडे द्यायला तयार असताना देखील ते चित्रपट प्रशासनाला मान्य नाही. माझा येथील दिवसाचा गल्ला जेम तेम 10 हजार असून दरमहा दोन लाख भाडे मी कसे देणार असा सवाल त्यांनी केला. माझ्या सारख्या मराठी माणसाला रस्त्यावर आणून त्या ठिकाणी फूड मॉल बनविण्याचा चित्रपट प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.