Join us  

कामगारांची उपासमार

By admin | Published: July 09, 2015 1:01 AM

रात्री-अपरात्री केव्हाही धोकादायक काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना गेले कित्येक महिने पगार मिळालेला नाही.

चिरनेर : रात्री-अपरात्री केव्हाही धोकादायक काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना गेले कित्येक महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही नियमित नसल्याने कामगारांना काटकसर करून कुटुंब चालवावे लागत आहे. या कंत्राटी कामगारांचा अजूनपर्यंत कधीही वेळेवर पगार झालेला नाही. आॅक्टोबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या महिन्यांचा पगार २७ एप्रिलला मिळाला, तोही शासनाने ठरविला त्याप्रमाणे नाही, त्यानंतर अद्याप कामगारांना पगार मिळाला नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. रात्री-अपरात्री केव्हाही वीज जाते, वाऱ्यामुळे विजेचे खांब, तारा पडतात. रात्रीच्या वेळी दुरुस्तीचे जोखमीचे काम या कामगारांना करावे लागते, तरीही वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे कामगार आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १,१७८ कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना कधी दरमहा ६ हजार तर कधी ७ हजार याप्रमाणे पगार काढला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. -------आधीच्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगाराबाबत सुसूत्रता ठेवलेली नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी या कामगारांची पगाराची निविदा मंजूर झाली नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. यापुढे कामगारांचा वेळेवर पगार होईल, याबाबत दक्षता घेतली जाईल. कामगारांसाठी वेगवेगळे ठेकेदार नेमले असून, त्यांच्याकडून या कामगारांना पगार दिला जात आहे. - दत्तात्रेय गोसावी, कार्यकारी अभियंता, पनवेल