मुंबई : मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले, पण अजूनही विद्यापीठाची परीक्षा संपलेली नाही. कारण आत्ताही विद्यापीठ तब्बल २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध घेत आहे. त्यामुळे विद्यापीठात झालेल्या बैठकीत, विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा मार्ग विद्यापीठाने शोधल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राखीव निकाल लवकर जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने ही शक्कल लढविली आहे.मुंबई विद्यापीठात यंदा उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे निकाल लांबले. त्यामुळे विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागले, पण सर्व निकाल जाहीर झाल्यानंतरही उत्तरपत्रिकांचा घोळ संपलेला नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली आहे. अर्धवट कोड वापरला गेल्याने, या उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली आहे, पण अजूनही विद्यापीठाला या उत्तरपत्रिकांचा शोध घेता आलेला नाही.विद्यापीठाकडून दुजोरा नाहीविद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यावर त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, पुन्हा प्रक्रिया राबविली, त्या वेळी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या. त्यातल्या एका कंपनीची निवड करण्यात आली. त्या वेळी कंपनीच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आता निकाल प्रक्रिया संपत आल्यावरही, विद्यापीठ तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे. राखीव निकाल जाहीर करताना विद्यापीठाची तारांबळ उडत आहे. सप्टेंबर महिन्यातही निकाल न लागल्याने, विद्यापीठाने आता सरासरी गुण देण्याचा पर्याय निवडला आहे. विद्यार्थ्याचे गुण पाहून त्याला राखीव विषयात गुण द्यायचे असे ठरविले आहे, पण अजूनही या गोष्टीला विद्यापीठाने दुजोरा दिलेला नाही.
उत्तरपत्रिकांची शोधाशोध सुरूच! तब्बल २ हजार उत्तरपत्रिका गायब; मुंबई विद्यापीठ देणार का सरासरी गुण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:30 AM