ठाणे स्टेशन परिसरात होर्डींग्ज पडले, सुदैवाने जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 04:11 PM2019-06-13T16:11:02+5:302019-06-13T16:13:05+5:30
मुंबईत होर्डींग्ज पडून एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात गुरवारी स्टेशन परिसरात एसटी स्थानक परिसरात होर्डींग्ज पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिका मात्र जागी झाली असून त्यांनी होर्डींग्जवाल्यांच्या विरोधात कडक धोरण राबविण्यास सुरवात केली आहे.
ठाणे : ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँड परिसरात असलेला होर्डींग्ज पडल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील शहरातील होर्डींग्जचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात महापालिकेने याला परवानगी दिली नसून एसटी विभागामार्फत ती देण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
बुधवारी मुंबईत होर्डींग्ज पडून एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी ठाण्यात होर्डींग्ज पडल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पासून शहरात पावसाने उसंत घेतली असली तरी देखील सोसाट्याचा वारा मात्र जोरात सुरु आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून शहरात पडझड सुरु आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाणे स्टेशन परिसरातील एसटी डेपो जवळील डेपोच्या भिंतीवर उभारण्यात आलेले होर्डींग्ज वाऱ्यामुळे खाली पडले. ते पडत असतांना मध्ये वायर आल्याने होर्डींग्ज त्यामध्ये काही काळ अडकले होते. त्यानुसार एसटी विभागामार्फत याची तत्काळ दखल घेत, येथील वाहतुक त्यांनी बंद केली. त्यानंतर ते होर्डींग्ज खाली काढण्यात आल्याची माहिती एसटी विभागामार्फत देण्यात आली. एसटी स्टेशन हे अतिशय वर्दळीचे ठिकाण मानले जाते. परंतु सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. असे असले तरी या होर्डींग्जला ठाणे महापालिकेने परवानगी दिली नव्हती. त्याची परवानगी ही एसटी महामंडळाने दिली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
या घटनेत कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही, तसेच या पुढे अशी घटना होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शिवाय जे धोकादायक स्थितीत होर्डींग्ज आले असतील ते काढण्याची कारवाई केली जाईल.
(श्यामराव भोईर - स्थानक प्रमुख, ठाणे एसटी डेपो)
मोबाइल होर्डींग्ज व्हॅनवर पालिकेची कारवाई
स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागालाही जाग आली असून त्यांच्या मार्फत मोबाइल व्हॅन होर्डींग्जवर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. शहरात आजच्या घडीला असे २१ ठिकाणी मोबाइल व्हॅन होर्डींग्ज असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावसाळ्याच्या काळात अशा होर्डींग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार आता स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेनंतर पालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. तसेच ज्या होर्डींग्जवाल्यांनी अद्यापही स्थैर्यता प्रमाणपत्र दिले नसेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.
यापूर्वीसुध्दा आमच्या विभागाकडून होर्डींग्जसाठीचे स्थैर्यता प्रमाणपत्र मागविण्याची कार्यवाही केली जात आहे. परंतु आता ज्यांनी ते सादर केले नसेल त्यांचे होर्डींग्ज काढले जाणार आहे. शिवाय मोबाइल होर्डींग्ज व्हॅनवरही कारवाई सुरु झाली आहे.
(संदीप माळवी- उपायुक्त, ठामपा)