मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे दोन दिवसांपासून मंदावलेली लोकलची वाहतूक शनिवारी आणखीनच कूर्मगतीने झाली. परिणामी सीएसएमटी गाठताना प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. अनेक लोकल परळ, भायखळ्यापर्यंतच धावत होत्या. भायखळा ते सीएसएमटीदरम्यान बेस्टने सेवा दिली परंतु तीही तोकडी पडली.
सीएसएमटी आणि ठाणे येथील कामांमुळे शनिवारी मध्य रेल्वेवर लोकलच्या ५३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शनिवारी सकाळपासून लोकल ३० मिनिटांहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या. मुलुंड, विक्रोळी, कांजुरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. कर्जत-कसारा-कल्याण येथून येणाऱ्या प्रवाशांची मुंबई गाठताना दमछाक झाली.