मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर शुक्रवारी दस-याची सकाळ जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयासाठी दुर्दैवाची ठरली. एका बाजूला शहर-उपनगरात दसरा साजरा होत असताना परळ येथील केईएम रुग्णालयात मात्र जखमींना पाहण्यासाठी नातेवाईक आणि आप्तेष्टांची रीघ लागली होती. कुणाचा भाऊ, कुणाचे मित्र, कुणाचे आई-वडील आपल्या माणसांसाठी धावपळ करताना दिसत होते. या दुर्घटनेतील २३ जणांचा मृत्यू, तर ३८ जखमी झाले आहेत.एल्फिन्स्टन दुर्घटनेत जखमी झालेल्या सत्येंद्र कुमार कनोजिया यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. शुक्रवारपासून सत्येंद्र कुमार यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याविषयी सांगताना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे म्हणाले की, सत्येंद्र यांची परिस्थिती फार गंभीर होती. त्यांच्याडोक्याला दुखापत झाली होती आणि शुक्रवारपासून ते व्हेंटिलेटवर होते. अखेर शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, त्यांचे नातेवाईकदेखील या वेळी उपस्थित होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १८ जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांना सोपविण्यात आले आहेत. ३८ जखमींपैकी शनिवारी केवळ एकाच रुग्णाला घरी सोडण्यात आले असल्याचे केईएम रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी सांगितले.‘तो’ अजूनही देतोय भावाला हाकवडिलांच्या फुलाच्या व्यवसायाला हातभार लावावा म्हणून छोटी-मोठी मदत करणारी विक्रोळीची दोन भावंडे कालच्या एल्फिन्स्टन दुर्घटनेचा बळी ठरली. त्या दुर्घटनेत आठवीत असणाºया रोहित परबचा जीव गेला, अन् मोठा भाऊ आकाश हा गंभीर जखमी आहे. शनिवारी दुपार सरली तरी आपला भाऊ गेल्याचे आकाशला सांगितले नसल्याने तो अजूनही आपल्या लहान भावाला हाक मारतो आहे.फुले घेऊन येताना हे पुलावर चढत होते, अचानक मागून कुणीतरी आवाज दिला की, ‘पूल पडला...’ त्यानंतर लगेचच रोहितने दादा म्हणून हाक मारली. आकाशने जाऊन त्याला कवटाळले; मात्र गर्दीच्या लोंढ्याने ते पडले, नंतर वेगळे झाले. रोहितचा हात आकाशच्या हातातून निसटला, असा प्रसंग आकाशने सांगितल्याचे त्याचे काका वासुदेव गावडे यांनी सांगितले. रुग्णालयाच्या २५ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उपचार घेणाºया आकाशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाठीच्या मणक्यापासून संपूर्ण पायाची हालचाल थांबली आहे.अपघात झाला हीपत्नीला थट्टा वाटलीएल्फिन्स्टन दुर्घटनेत ३५ वर्षीय नरेश कांबळे जखमी झाले. त्यांच्या एका मित्राने त्यांच्या पत्नीला कांबळेंचा अपघात झाल्याचे कळविले. मात्र ही थट्टा असल्याचे वाटल्याने त्यांच्या पत्नीने विश्वासच ठेवला नाही, असे कांबळे यांनी सांगितले. मात्र तीच पत्नी शनिवारी केईएम रुग्णालयात कांबळे यांच्या उशाशी बसून दुर्घटनेच्या आठवणीने विव्हळत होती.कांबळे यांच्या पत्नीने सांगितले की, सकाळी १०.३० सुमारास यांच्या मित्राचा कॉल आला. मला कोणीतही मुद्दाम चेष्टा करत असल्याचे वाटले. म्हणून मी विश्वास ठेवला नाही. पण त्यानंतर टीव्हीवर बातमी पाहिली अन् त्या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने ताबडतोब यांना फोन केला. रुग्णालयात धाव घेतल्यावर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याने काय करावे, हेही सुचत नव्हते. पण नरेश यांची भेट झाल्यावर जिवात जीव आला. अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, फ्रॅक्चर झाले आहे.गर्दीचा लोंढा अंगावर आला अन् श्वास गुदमरलादिव्याची २७ वर्षांची रेश्मा कदमही या घटनेमध्ये जखमी झाली. आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्रमिता कदम धावतपळत केईएम रुग्णालयात आल्या, पण रेश्माला जखमी अवस्थेत पाहून त्यांना धक्का बसला आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांनाही उपचारांसाठी केईएममध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताबाबत रेश्मा कदम हिने सांगितले की, माझ्याकडे छत्री नव्हती. त्यामुळे मी जिन्यावरच थांबले होते, पण चेंगराचेंगरी झाल्यानंतर मी खाली पडल्याने छातीवर जोर आल्याने श्वास गुदमरला.- रेश्मा कदम, दिवाआता मला घ्यावी लागेल ‘आई’ची जागाएल्फिस्टनच्या दुर्घटनेत जखमींमध्ये बारावीत शिकणाºया विरेश सावंतची आईदेखील आहे. विरेश आणि त्याची आई घाटकोपरमध्ये एका चाळीत राहतात. विरेशची आई महानंदा सावंत या एल्फिन्स्टन भागातील कामाला आहेत. नेहमीप्रमाणे त्या कामावर जाण्यास एल्फिन्स्टन स्टेशनच्या ब्रीजवर आल्या, पण चेंगराचेंगरीत महानंदा सावंत या जखमी झाल्या. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझ्या आईची काळजी घेण्यास कोणी नाही. त्यामुळे मला आता आईची काळजी घ्यावी लागेल.- विरेश सावंत, घाटकोपर
हुरहुर.. चिंता कायम! केईएम रुग्णालयातील चित्र, जखमींना पाहण्यासाठी आप्तेष्टांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:11 AM