चक्रीवादळाचा आठ विमानतळांवरील सेवांवर परिणाम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:38+5:302021-05-17T04:06:38+5:30
मुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या आठ विमानतळांवरील सेवांवर परिणाम झाल्याचे विमान कंपन्यांनी म्हटले आहे. चेन्नई, थिरुवनंतपुरम, कोची बंगळुरू, गोवा, ...
मुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या आठ विमानतळांवरील सेवांवर परिणाम झाल्याचे विमान कंपन्यांनी म्हटले आहे. चेन्नई, थिरुवनंतपुरम, कोची बंगळुरू, गोवा, मुंबई आणि पुणे विमानतळाचा त्यात समावेश आहे.
एअर विस्ताराने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौउते चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाला आहे. सोसाट्याचे वारे आणि काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सेवेवर परिणाम झाला आहे. १७ मेपर्यंत हा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने चेन्नई, थिरुवनंतपुरम, कोची, बंगळुरू, गोवा, मुंबई आणि पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमान फेऱ्यांची सद्य:स्थिती पाहूनच घराबाहेर पडावे, अशा सूचना केल्या आहेत.
तर चक्रीवादळामुळे गोवा, बेळगाव, हुबळी आणि कोल्हापूर येथील सेवेवर परिणाम झाल्याचे इंडिगो या विमान कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, याबाबत मुंबई विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला असता चक्रीवादळामुळे विमान सेवेवर परिणाम झाल्याची कोणतीही माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले.