Join us  

चक्रीवादळाचा एसटी कर्मचाऱ्यांच्या घरांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

तीन महिन्यांच्या बिनव्याजी अग्रिम वेतनासह खास रजा देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चक्रीवादळाचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका बसला ...

तीन महिन्यांच्या बिनव्याजी अग्रिम वेतनासह खास रजा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका बसला असून त्यामुळे तीन महिन्यांचे बिनव्याजी अग्रिम वेतन व खास रजा देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, १४ मे ते १८ मेरोजी तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरांचे तसेच स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे बिनव्याजी अग्रिम वेतन देण्याबाबत कामगार करारात तरतूद असून यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्यावेळी त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे बिनव्याजी अग्रिम वेतन देण्याबाबत तसेच कर्मचारी वर्ग खाते परिपत्रकानुसार विशेष (खास) रजा देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

.................................