मुंबई : सोमवारी (दि. १७) पडलेल्या चक्रीवादळाच्या पावसाने वांद्रे येथील इंदिरानगर पाईपलाईनवरील नागरिकांच्या घरांची छपरे वाऱ्याने उडून गेली. काही कुटुंबीयांच्या घरांत पाणी घुसले. पाण्यामुळे घराची कागदपत्रेदेखील भिजून गेली. छोटी मुले, महिला, वृद्ध लोक भर पावसात आणि वादळात उपाशीपोटी रस्त्यावर आले. वांद्रे टर्मिनसच्या पुलाखाली बसून या नागरिकांना संपूर्ण रात्र उजाडावी लागली. युवा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांची रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली, अशी माहिती युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प साहाय्यक नामदेव गुलदगड यांनी दिली.
इंदिरानगर पाईपलाईन, वांद्रे (पूर्व) या ठिकाणी ७ नोव्हेंबर २०१७ रोजी महापालिकेकडून ४३६ झोपड्यांची तोडमोड करण्यात आली होती. पात्र झोपड्या म्हणून केवळ १५५ कुटुंबीयांना त्यावेळी माहुल गाव या ठिकाणी पुनर्वसन दिले होते. पाईपलाईनच्या बाजूला ४३६ झोपड्या होत्या. त्यांतील १५५ झोपड्यांना पुनर्वसन मिळाले आहे. उर्वरित २८१ झोपड्यांची कागदपत्रे अपील प्रकरण म्हणून महापालिकेकडे चार वर्षांपासून पडलेली आहेत. या २८१ कुटुंबीयांना घरे मिळणार की नाही? कधी मिळणार? अशी कोणत्याच स्वरूपाची माहिती महापालिका चार वर्षांपासून देत नाही. जानेवारी २०१८ साली युवा संस्थेने राज्य मानवी हक्क आयोगात दाखल केलेल्या याचिकेवर ३० नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत राज्य मानवी हक्क आयोगाने प्रकरण निकाली काढले. राज्य मानवी हक्क आयोगाने तीन महिन्यांच्या आत उर्वरित २८१ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचे आदेश महापालिकेला दिले. मात्र आजपर्यंत पुनर्वसन झालेले नाही.
दरम्यान, वांद्रे पूर्व सरकारी वसाहतीत विजयनगर म्हाडा वसाहतीलगत साईकृपा रहिवासी संघ ही मोठी वस्ती आहे. सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वस्तीत अनेकांच्या घरी पाणी तुंबले होते. अशात संध्याकाळी साडेचारच्या सुमारास जवळील विजयनगर या म्हाडा वसाहतीच्या कंपाऊंडमध्ये असलेले एक मोठे झाड येथील पाच घरांवर आणि साईमंदिराच्या मंडपावर कोसळले. यात मोठी वित्तहानी झाली आहे.