चक्रीवादळाने रोखले विमानांचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:05 AM2021-05-18T04:05:54+5:302021-05-18T04:05:54+5:30
मुंबई विमानतळ तब्बल ७ तास बंद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. मुसळधार पाऊस ...
मुंबई विमानतळ तब्बल ७ तास बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सोमवारी विमानतळ ७ तास बंद ठेवण्यात आले.
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची सूचना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि कार्गो विमानसेवा सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली विमाने अन्यत्र वळविण्यात आली. त्यात स्पाइस जेटचे १ आणि इंडिगोच्या दोन विमानांचा समावेश होता.
चेन्नईहून निघालेले स्पाइस जेटचे विमान सकाळी ८.१५ वाजता मुंबई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते; परंतु हवामानातील बदलांमुळे हे विमान सुरतच्या दिशेने वळविण्यात आले. त्याचप्रमाणे लखनौवरून मुंबईला येणारे इंडिगोचे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले, तर सतर्कतेचा इशारा मिळताच इंडिगोचे आणखी एक विमान हैदराबाद विमानतळावर वळविण्यात आले.
हवामान विभागाकडून अलर्ट मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावरून एकाही विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे अन्य विमानतळांवरून मुंबईच्या दिशेने येणारी विमाने रद्द करण्याची सूचना देण्यात आली. जवळपास २०० विमान फेऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.
* प्रवासीसंख्या कमी झाल्याने मोठा फटका नाही
कोरोनामुळे मुंबई विमानतळावरून दिवसाला केवळ २०० च्या आसपास विमान उड्डाणे होत आहेत. कोरोनापूर्वी येथून प्रतिदिन ९७० विमाने ये-जा करायची. येथील दैनंदिन प्रवासी संख्याही १७ हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा तितका मोठा फटका बसला नसल्याचे सांगण्यात आले; परंतु ऐनवेळी विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. चक्रीवादळाची पूर्वसूचना ८ दिवसांपूर्वी मिळाली होती. किनारपट्टी जवळ असल्याने मुंबई विमानतळाला त्याचा फटका बसणे साहजिक होते. अशावेळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय दोन-तीन दिवस आधीच जाहीर करणे गरजेचे होते, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.
------------------------------------