महा चक्रीवादळामुळे गुजरातला पावसाचा इशारा कायम, मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:46 PM2019-11-06T18:46:45+5:302019-11-06T18:47:01+5:30
हवामानात सातत्याने बदल होत आहेत. परिणामी ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे.
मुंबई : हवामानात सातत्याने बदल होत आहेत. परिणामी ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. आता हे चक्रीवादळ गुरुवारी दुपारी गुजरातच्या किनारी धडकणार आहे. चक्रीवादळाचा जोर कमी होणार असल्याने त्याचा फटका गुजरातला तुलनेने कमी बसणार असला तरीदेखील गुजरातला देण्यात आलेल्या पावसाचा इशारा कायम आहे. दुसरीकडे उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ‘महा’ चक्रीवादळ पोरबंदरपासून ३५० किलोमीटर, वेरावलपासून ३७० किलोमीटर, दिवपासून ४२० किलोमीटर अंतर दूर होते. जस जसे चक्रीवादळ पुढे सरकत आहे; तस तसे त्याचा जोर ओसरत आहे. बुधवारी सायंकाळी चक्रीवादळाचा जोर आणखी कमी झाला. गुरुवारी सकाळी चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रास होण्यास सुरुवात होईल. गुरुवारी दुपारी चक्रीवादळ जेव्हा गुजरातला धडकेल तेव्हा ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामानात सातत्याने बदल नोंदविण्यात येत आहेत. परिणामी चक्रीवादळाचा जोर ओसरणार असला तरी गुजरातला देण्यात आलेला पावसाचा इशारा कायम आहे. भावनगर, सुरत, भरुच, आनंद आणि वडोदरासह बटोड आणि अहमदाबादमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. तर मध्य महाराष्ट्रातील काही तालुक्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्हयात गुरुवारी सकाळपासून पुढील बारा तासांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच ८ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अती तीव्र चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य व लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे चक्रीवादळाचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल.
.................................
तुरळक ठिकाणी पाऊस
७ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पालघर आणि ठाणे जिल्हयात सोसाटयाचा वारा वाहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये.
.................................
मुंबई ढगाळ
७ आणि ८ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
.................................
‘बुलबुल’ चक्रीवादळ
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, या चक्रीवादळास हवामान खात्याने ‘बुलबुल’ नाव दिले आहे. सद्यस्थितीमध्ये ही हवामान प्रणाली ओरिसापासून ८२० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतरण चक्रीवादळात होईल. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल, ओरिसा आणि बांग्लादेशला बसेल.