चक्रीवादळाचा तडाखा
By admin | Published: November 19, 2014 10:59 PM2014-11-19T22:59:05+5:302014-11-19T22:59:05+5:30
सुधागड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.
पाली : सुधागड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळच्या वेळी पाऊस पडतो. मंगळवारी पाली सुधागड परिसरातील परळी गावासह सात गावांतील अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त झाले. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली. तर काही घरांचे कौले, पत्रे उडाल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल झाले. वादळामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती.
सुधागड तालुक्यातील परळी, जांभूळपाडा, नाणोसे, ढोकशेत, दहिगाव, करचुंडे आणि हेदविली या गावांना या वादळाचा तडाखा बसला असल्याचे तहसीलदार व्ही.के. रौंदाळ यांनी सांगितले. सुमारे १५० च्यावर घरांचे पत्रे तर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अनेक इमारतींचे पत्रे उडाले आहेत.
तहसीलदार रौंदाळ व ग्रामसेवक, तलाठी कर्मचारी, पाली पंचायत समितीच्या सभापती दीपाली बेलोसे, माजी सभापती भारती शेळके, जांभूळपाडा सरपंच मिलिंद बहाडकर, आदींनी भागांना भेटी देऊन पाहणी केली. (वार्ताहर)