गिर्यारोहकाचा हिमवादळात मृत्यू, उत्तराखंडचा चैनशील ट्रेक सर करताना झाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:37 AM2018-04-13T05:37:04+5:302018-04-13T05:37:04+5:30
मीरा रोड येथील सुमीत कवळी (२८) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील हिमवादळात सापडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
- अजय महाडिक
मुंबई : मीरा रोड येथील सुमीत कवळी (२८) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील हिमवादळात सापडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुमीत ५ एप्रिलला युथ हॉस्टेल्स असोसिएशन आॅफ इंडिया या गिरीभ्रमण संस्थेमार्फत उत्तराखंड येथे गेला होता. सुमीतच्या मागे त्याची पत्नी, आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.
सुमीतचे मूळगाव हे वसईतील आगाशी येथे असून तो मीरा रोड येथे राहत असे. सुमीतने अमित व गौरव या मित्रांसोबत युथ हॉस्टेल्स असोसिएशन आॅफ इंडीया, या गिर्यारोहण संस्थेत चैनशील ट्रेकसाठी चार महिने आधी आॅनलाइन नोंदणी केली. ५ एप्रिलला ते तिघे उत्तराखंडला जाण्यास निघाले. चैनशील ट्रेकचे उच्च शिखर समताटच (११६४७ फूट) सर केल्यानंतर त्यांना बेसकॅम्पवर परतायचे होते.
६ तारखेला डेहराडून येथून बालावत (६२८३ फूट) या बेसकॅम्पवर त्यांनी हजर झाल्याची नोंद केली. मुख्य ट्रेकला त्यानंतर दोन दिवसांनी सुरुवात झाली होती. त्यांच्यासोबत गिरीभ्रमणासाठी ४० जणांची टीम होती. सोबत स्थानिक वाटाडे मदतीला होते.
पहिला कॅम्प सनौटी (१०४०० फूट) हे ८ किलोमीटर अंतर त्यांनी पहिल्याच दिवशी सर केले. १० तारखेला समताटच या ट्रेकच्या सर्वांत उंच कॅम्पला जाताना संध्याकाळी अचानक प्रचंड हिमवादळाला सुरुवात झाली. दोन फूटावरीलही दिसेनासे झाल्यामुळे गिर्यारोहक भरकटले. त्या वेळी सुमीत व एक स्थानिक वाटाड्या मागे राहिले. इतर गिर्यारोहक जेमतेम कॅम्पपर्यंत पोहोचले. प्रचंड हिमवादळात सापडलेल्या सुमीतला श्वास घेताना त्रास झाला. त्याच्या शरीराचे तापमान झपाट्याने कमी होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने त्याची शुद्ध हरपली. वाटाड्या गिर्यारोहकाने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने कॅम्पकडे मदत मागितली. ते गिर्यारोहक कॅम्पवर येईपर्यंत सुमीतचे निधन झाले होते. ही घटना १० तारखेला घडली. ११ तारखेला बेसकॅम्पला सुमीतचा मृतदेह आणण्यात आला.
>लष्कराच्या चॉपरची मागणी
नेटवर्क नसल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. गुरुवारी सकाळी सुमीतचा मृतदेह तेथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे पार्थिव डेहराडून येथे नेण्यात येईल. लष्कराकडून चॉपर उपलब्ध झाल्यास तेथून दिल्ली व नंतर विमानाने ते मुंबईला आणण्यात येईल, असे युथ हॉस्टेल्स असोसिएशन आॅफ इंडिया या महाराष्ट्रातील संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश किणी यांनी सांगितले.
काका व भाऊ उत्तराखंडला
डेहराडून येथील संस्थेचे संपर्कप्रमुख प्रशांत बिहार यांनी मदतकार्य वेळेवर मिळत नसल्यामुळे मृतदेह बेसकॅम्पवर आणण्यात वेळ गेला, असे सांगितले. पृढील सोपस्कार पूर्ण होण्यास किती वेळ जाईल हे आता सांगता येणार नाही. त्याचे काका व भाऊ उत्तराखंड येथे गेले आहेत. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यावर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याचे पार्थिव मुंबईत आणण्यात येईल, असे प्रशांत बिहार यांनी सांगितले.