तौक्ते चक्रीवादळ : लसीकरण पूर्णतः बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:07+5:302021-05-17T04:06:07+5:30
मुंबई : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय ...
मुंबई : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि. १७) मुंबईत सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर १८, १९ आणि २० मे रोजी लसीकरणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही चहल यांनी सांगितले.