Join us

ताैउते चक्रीवादळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

मुंबई : अरबी समुद्रातील ‘तौउते’ चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा ...

मुंबई : अरबी समुद्रातील ‘तौउते’ चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.

रविवारी सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

याप्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील राज्य सरकारने घेतलेल्या खबरदारीची विस्तृत माहिती दिली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव मदत पुनर्वसन असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.