‘तौउते’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:02+5:302021-05-19T04:06:02+5:30

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून ‘तौउते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांची झोप ...

Hurricane 'Tauute' caused great loss to fishermen | ‘तौउते’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान

‘तौउते’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान

Next

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून ‘तौउते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांची झोप उडविली आहे. आधीच कोरोनाच्या महामारीतून मच्छीमार बांधव कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करीत होते. आता पुन्हा एकदा मच्छीमारांवर नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून मोठे संकट उभे राहिले आहे.

‘महा’ आणि ‘क्यार’ वादळानंतर त्यांच्यावर कोरोनाचे सावट आले, मग ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे सावट, त्यानंतर पुन्हा कोरोना लॉकडाऊनचे सावट आणि आता पुन्हा ‘तौउते’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे कंबरडेच मोडले आहे.

‘तौउते’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या वादळात जे मच्छीमार बांधव बेपत्ता झाले आहेत किंवा या वादळामध्ये जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत त्वरित सरकारने करावी व ज्यांचे बोटींचे, जाळ्यांचे, घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे अशांना त्वरित आर्थिक मदत ही सरकारने करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने सर्व मच्छीमार बांधव मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा इशारा भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीमार बांधव हे आपल्या उपजीविकेसाठी कुठे ना कुठे धडपड करीत आहेत; परंतु कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मच्छीमार बांधव गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी मदत न मिळाल्याने आता त्यांच्या समोर त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी ‘महा’ आणि ‘क्यार’ चक्रीवादळाची नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच ‘निसर्ग’ चक्रीवादळाची भरपाईही लवकरात लवकर देण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्र शासनाला केली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांच्या तोंडाला पान पुसली आहेत, असा आरोप ॲड. चेतन पाटील यांनी केला.

‘तौउते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचे खूप नुकसान झाले असून, त्यांच्या होड्या, जाळे, घरे, फळबागा तुटल्या असल्याने मत्स्यव्यवसायमंत्री, तसेच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘निसर्ग’ चक्रीवादळात रायगडच्या परवाने अधिकाऱ्यांनी व सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी तेथील सातशे ते आठशे बोटींचे परवाने व्हीआरसी रिन्यू न केल्याने त्यांना निसर्ग चक्रीवादळात नुकसानभरपाईसाठी दावेदारी करता आली नाही. याची जबाबदारी रायगड जिल्ह्यातील परवाना अधिकारी व सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांची आहे. या सर्वांची तक्रार आम्ही मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे व सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना करूनही आजपर्यंत त्यांनी याप्रकरणी तोडगा काढलेला नाही. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मच्छीमार बांधवांना हे नुकसान सहन करावे लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

कोकणातील मच्छीमार बांधवांनी ज्या पक्षांना मदत करून एवढा मोठा केला आहे त्या पक्षाचे सरकार असूनही मुंबईतील मच्छीमार बांधवांना व कोकणातील मच्छीमार बांधवांना एवढे हाल सोसावे लागत आहेत. जेव्हा त्यांच्यावर अस्मानी व नैसर्गिक संकट येते तेव्हा यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेत असल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला.

---------------------------------------

Web Title: Hurricane 'Tauute' caused great loss to fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.