तुफान वारा आणि मुसळधारा; मुंबईत अधूनमधून पावसाचा मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:10+5:302021-07-24T04:06:10+5:30
मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात झालेल्या हवामान बदलाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा सुरूच ...
मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात झालेल्या हवामान बदलाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा सुरूच असून, शुक्रवारीदेखील मुंबई शहरासह उपनगरात वाऱ्याच्या वेगाने मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी उपनगराच्या तुलनेत शहरात थोडा अधिक प्रमाणात पाऊस असल्याचे चित्र होते.
मुंबईची पहाटच रिमझिम पावसाने झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरात बहुतांश ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. सकाळी नऊ-दहा वाजता रिमझिम बरसणारा पाऊस ११ वाजता मात्र रौद्र स्वरूप धारण करू लागला. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दक्षिण आणि मध्य मुंबईवर पावसाचे मोठे ढग दाटून आले.
तुरळक ठिकाणी पाऊस कोसळल्याने कुलाबा येथे १२, तर सांताक्रुझ येथे १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात ४, पूर्व उपनगरात २१ आणि पश्चिम उपनगरात १६ मिमी पावसाची नोंद झाली. अधूनमधून पाऊस कोसळत असतानाच एकूण सहा ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सात ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. अठरा ठिकाणांहून झाडे पडल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेला प्राप्त झाल्या.