मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ या दोन चक्रीवादळानंतर राज्यासह मुंबईच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबई शहरासह उपनगर आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी सकाळी गार तर दुपारी गरम वातावरण असल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गुरुवारी मुंबई ढगाळ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषत: मुंबईत ठिकठिकाणी नोंदविण्यात येत असलेल्या कमाल आणि किमान तापमानात सरासरी ८ ते १० अंशाचा फरक नोंदविण्यात येत आहे.
कधी थंड तर कधी गरम अशा दुहेरी वातावरणाचा त्रास मुंबईकरांना करावा लागत असल्यचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ६ नोव्हेंबर रोजी गोरेगाव आणि घाटकोपर येथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसहून अधिक नोंदविण्यात आले. हे या दिवसाचे मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान होते. तर, कुलाबा, वरळी, माझगाव, दादर, वांद्रे, बीकेसी, अंधेरी, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, चेंबूर, विद्याविहार, पवई, जोगेश्वरी, भांडुप, मुलुंड, नेरुळ, पनवेल येथे याच दिवशी कमाल तापमान ३० ते ३४ अंशापर्यंत नोंदविण्यात आले.किमान तापमानाचा विचार करता, कुलाबा, वरळी, बीकेसी, घाटकोपर येथे किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.वरळी, माझगाव, दादर, वांद्रे येथे २४ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, पवई, जोगेश्वरी, भांडुप आणि मुलुंड येथील किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सियसच्या आसपास होते.कमाल, किमान तापमानात ८ ते १० अंशांची तफावतमुंबईतील कमाल आणि किमान तापमानात सरासरी ८ ते १० अंशाचा फरक नोंदविण्यात येत आहे. गोरेगाव, घाटकोपरचे कमाल तापमान बुधवारी ३५ अंश सेल्सियसहून अधिक होते. हे या दिवसाचे मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान होते.तर, याच दिवशी बोरीवली, पवई आणि पनवेल येथे २१ अंश सेल्सियसच्या आसपास किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे या दिवसाचे सर्वात कमी तापमान होते.