घर तोडल्याने पती-पत्नीने घेतले विष
By admin | Published: October 25, 2016 03:44 AM2016-10-25T03:44:53+5:302016-10-25T03:44:53+5:30
भार्इंदरच्या पश्चिमेला मिठागरालगतचे अनधिकृत घर तोडण्याची कारवाई सुरु असताना पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीने दोन्ही मुलांनाही विष पाजण्याचा
मीरा रोड : भार्इंदरच्या पश्चिमेला मिठागरालगतचे अनधिकृत घर तोडण्याची कारवाई सुरु असताना पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीने दोन्ही मुलांनाही विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. स्थानिक नगरसेवक अशोक तिवारी यांच्या दबावामुळे पालिकेने आमच्याच घरावर तीनवेळा कारावई केल्याचा आरोप त्यांनी केला. तो नगरसेवकाने फेटाळला.
शिवसेना गल्लीतील जय बजरंगनगरात मिठागरालगत पूर्वीपासून माछी लोकांची वस्ती आहे. त्याच भागात भूमाफियांनीही खारफुटी तोडून सीआरझेड हद्दीत व पाणथळ जागेत बेकायदा भराव टाकून चाळी बांधल्या. तेथील अमृत माछी (३७) यांछे घर तोडण्यासाठी प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत व पथक सोमवारी दुपारी गेले. कारवाईला अमृत व त्यांची पत्नी ज्योती (३०) यांनी विरोध केला, पण कारवाई सुरु झाल्याने दोघेही उंदीर मारण्याचे औषध प्यायले. तसेच आपला लहान मुलगा व मुलीलाही विष पाजण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलांना बाजुला घेतले.
अमृत व ज्योती यांना भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगत चव्हाण यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
लाच घेतल्याचे प्रकरण
अशोक तिवारी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले असले, तरी त्यांनी आता भाजपाशी घरोबा केला आहे. तिवारी हे प्रभाग समितीचे सभापती असताना २०१३ मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये म्हणून प्रभाग कार्यालयातच त्यांना आणि तत्कालिन प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना दीड लाखाची लाच घेताना मुद्देमालासह अटक करण्यात आली होती.
‘पैशांच्या व्यवहारात फसवले’
आम्ही येथे पिढीजात रहात असून घरालगतची आमची मोकळी जागा नगरसेवक अशोक तिवारी याने मागितली. तगादा लावल्याने आम्ही तयार झालो. साडेसहा लाखांचा व्यवहार ठरला. त्यातील पाच लाख तिवारी यांनी दिले. उरलेले पैसे मागितल्यावर त्यांनी उडवाउडवी सुरू करत घरावर कारवाई करायला लावण्याची धमकी दिली. पैसे मागू नये, म्हणून तिवारी यांनी पालिकेवर दबाव टाकून या आधीही आमचे घर दोन वेळा तोडायला लावले, असे अमृत म्हणाले.
‘व्यवहार झाला नाही’
नगरसेवक अशोक तिवारी यांनी अमृत माछी याचे आरोप फेटाळून लावत जागेचा कुठलाही विषय किंवा व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. या भागातील अन्य अनधिकृत बांधकामेही तोडण्यात आली आहेत. अमृतने तर तिवरांच्या झाडांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रत्यारोप तिवारी यांनी केला.