पत्नीची हत्या करणाऱ्यास अटक, भायखळा भाजी मंडईतून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:04 AM2020-03-03T00:04:49+5:302020-03-03T00:04:53+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणा-या पतीला शिवडी पोलिसांनी चार तासांच्या आत अटक केली.
मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणा-या पतीला शिवडी पोलिसांनी चार तासांच्या आत अटक केली. नसीम अन्सारी (३२) असे या आरोपीचे नाव असून त्याला भायखळा भाजी मार्केट येथून अटक करण्यात आली.
बीपीटी टोलनाक्याजवळील फ्री वेच्या १३६ क्रमांकाच्या खांबाजवळ २७ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका इसमाने एका महिलेला दगडाने ठेचून ठार मारल्याची माहिती पादचाºयाने गस्तीवरील पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
पुढील तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेतली. त्या वेळी मृत महिलेचे नाव यास्मिनबानो अन्सारी असून तिचा पती नसीम हा तुरुंगात असताना या महिलेच्या चारित्र्यावरील संशयावरून पतीने तिला ठार मारल्याचे एका इसमाने सांगितले. यानंतर गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आसपासच्या परिसरात तसेच सीएसएमटी, वांद्रे व एल. टी. टर्मिनसवर लक्ष ठेवण्यास सांगितले. आसपासच्या परिसरातील २५हून अधिक सीसीटीव्ही तपासले. यात भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये शर्ट, पॅण्ट रक्ताने माखलेला व्यक्ती फिरत असल्याचे निदर्शनास आले. तो नसीम असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आॅर्थर रोड कारागृहातून बाहेर आल्यावर पत्नी शिवडी येथे एका परपुरुषाबरोबर फिरताना दिसली. यामुळे तिला ठार मारले, अशी कबुली नसीमने पोलिसांकडे दिली. नसीमवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत १० तर रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये ३० गुन्हे दाखल आहेत.