पत्नीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पतीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:24+5:302021-01-17T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पती, सासू व नणंद यांना मुलीच्या ...

Husband beaten at wife's funeral | पत्नीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पतीला मारहाण

पत्नीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पतीला मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पती, सासू व नणंद यांना मुलीच्या नातेवाइकांनी चोप दिला. पती आणि सासरच्या जाचामुळेच तरुणीने आत्महत्या केली असा आरोप मृत तरुणीच्या नातेवाइकांनी करीत मारहाण केली.

अंबरनाथ (पूर्व) येथील बी केबिन परिसरात राहणाऱ्या सुषमा या २६ वर्षीय तरुणीचा विवाह मुंबईतील वडाळा परिसरात राहणाऱ्या विजय चंद्रकांत गुंडाळ (वय ३५) याच्याशी आठ महिन्यांपूर्वी झाला होता. काही दिवसांपूर्वी सुषमा तिच्या माहेरी आली होती. गुरुवारी रात्री ती अचानक घरातून निघून गेली आणि धावत्या लोकलसमोर उडी घेऊन तिने आत्महत्या केली. सुषमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास सुषमाचा मृतदेह तिच्या माहेरी आणला. यावेळी तिचे नातलग, शेजारी हे अंत्यविधीला जाण्यासाठी जमले होते. तिचा पती विजय, सासू गोपीबाई, नणंद राजश्री, संगीता हेही त्यावेळी तेथे आले. यावेळी संतप्त झालेल्या सुषमाच्या नातेवाइकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

शेवटी काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून विजय आणि त्याच्या नातेवाइकांना एका दुकानाच्या आत बंद करून ठेवले. नंतर रिक्षाने रुग्णालयात पाठविले. सुषमा ही उच्चशिक्षित व शांत तरुणी होती. तिला तिचा पती, सासू व नणंद हे शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. त्यातच हे चारही जण समोर दिसताच सुषमाच्या नातेवाइकांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यातूनच ही मारहाण केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या मारहाणीत जखमी झालेल्या विजय आणि त्यांच्या नातेवाइकांना उपचारासाठी छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारहाण झालेल्या विजयने वाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband beaten at wife's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.