मुंबई - लोकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे लाटल्याप्रकरणी ललित सावंत नावाच्या एका व्यक्तीला काही दिवसांपुर्वी पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. लोकांची फसवणूक करताना त्याने आपल्या घरालाही सोडलं नाही. आपल्या पत्नीलाही त्याने जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. पत्नीला तुझ्या भावाला नोकरी लावून देतो असो सांगत त्याने चक्क पाच लाख रुपये लाटले. ललितची स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला साजेशी आहे. त्याचा जन्म मुंबईतील खेतवाडी परिसरात झाला. त्याने एमपीएससीची परिक्षा दिली होती. पण त्यात नापास झाल्याने एका कंपनीत नोकरी करु लागला.
कांदिवली क्राइम ब्रांचने याप्रकरणी मयुरा मकवाना नावाच्या एका महिलेलाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला ललितला बोगस कागदपत्रं तयार करुन देण्यासाठी मदत करु होती.
2006 मध्ये झाली होती अटकएसीपी अभय शास्त्री आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी करत असताना अनेकांशी त्याची मैत्री झाली. त्याच्या एका मित्राचं नेहमी पत्नीशी भांडण होत होतं. यावेळी तिच्या पत्नीला घाबरवण्यासाठी त्याने पोलिसांचा गणवेश शिवून घेतला. पण ललितच्या मित्राने वसई पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली. ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.
अन्य प्रकरणातही झाला होता अटकयानंतर 2012 मध्येही ललितला मीर रोड पोलिसांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. 2014 मध्ये पुन्हा एकदा विरार पोलिसांनी त्याला अटक केली. इतकंच नाही तर ललितने नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या पत्नीलाही सोडलं नाही. व्यवसायाने वकील असणा-या आपल्या पत्नीला ललितने पाच लाखांचा गंडा घातला. ललितने मेहुण्याला नोकरी देण्याच्या बहाण्याने तिला फसवलं. ललितने तीन लग्न केली आहेत. तीन महिन्यांपुर्वी विरारच्या एका मंदिरात त्याने तिसरं लग्न केलं. त्याच्या तिस-या पत्नीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.