पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:24 IST2025-01-04T15:22:50+5:302025-01-04T15:24:13+5:30
घर नावावर करण्यासाठीही तगादा...

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट
मुंबई : दहिसरमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पंचनाम्यादरम्यान एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दहिसर पूर्वच्या रावळपाडा परिसरातील स्नेहसदन चाळीतील सुशील म्हामुणकर (४२) यांनी १३ नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर दहिसर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये त्यांची वही सापडली. वहीमध्ये सुशीलने बायकोच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी सुशीलचे वडील खंडेराव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ जानेवारी रोजी वैशाली आडविलकर (४८) हिच्याविरोधात गुन्हा
दाखल केला.
घर नावावर करण्यासाठीही तगादा
- वैशाली ही सुशीलसोबत किरकोळ गोष्टींवर वाद घालायची. त्याच्याकडे पैशाची मागणी करायची. हिशोब मागितला तर त्याला शिवीगाळ करायची असे तक्रारीत म्हटले आहे.
- त्याला एकट्याला सोडून आईच्या घरी जायची. सुशीलच्या वडिलांच्या मालकीचे घर ती स्वतःच्या नावावर करण्यासाठीही त्याच्यामागे तगादा लावत होती.
- ऑक्टोबरमध्ये सुशीलशी वाद घालून वैशाली माहेरी गेली. तिने घरी यावे यासाठी सुशीलने प्रयत्न केले, मात्र तिने नकार दिला. सुशीलने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप सुशीलच्या वडिलांनी केला आहे.