Join us

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती अटकेत

By admin | Published: January 04, 2016 1:35 AM

पत्नीची हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला गुरुवारी आंबोली पोलिसांनी अटक केली

मुंबई : पत्नीची हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला गुरुवारी आंबोली पोलिसांनी अटक केली. पत्नीचा मृत्यू घरात घसरून पडल्यामुळे झाल्याचे सांगितल्याने अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंधेरीत चार बंगला येथे राकेश प्रताप सिंग हा त्याची पत्नी ममता आणि दोन मुलांसह राहत होता. तो पूर्वी शेअर मार्केटमध्ये काम करत असे. मात्र गेल्या चार वर्षांपासून तो बेरोजगार आहे. आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबरला त्याने पत्नीला बेशुद्धावस्थेत अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी ही माहिती आंबोली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून ममताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या अहवालानुसार ममताचा मृत्यू घरात पडल्याने झाला नसून डोक्यावर जड वस्तूने आघात केल्याने झाल्याचे समोर आले. ‘शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आम्ही सिंग याला गुरुवारी अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे’, अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खडतरे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)