जाब विचारला म्हणून पतीने केली पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:06 AM2021-05-25T04:06:11+5:302021-05-25T04:06:11+5:30
मुंबई : कामावरून घरी येण्यास उशीर का झाला? याबाबत विचारणा करताच, पतीने २७ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना ...
मुंबई : कामावरून घरी येण्यास उशीर का झाला? याबाबत विचारणा करताच, पतीने २७ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास भांडूपमध्ये घडली. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत सोनू कुमार झा (२८) याला अटक केली आहे.
भांडूप पश्चिमेकडील राजाराम वाडीतील विश्वशांती चाळीत हे दाम्पत्य राहण्यास आहे. सोनू कुमार हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी घरी पोहोचायला त्याला दोन वाजले. अशात, घरी येण्यास उशीर का झाला? तसेच विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा करताच दोघांत वाद झाले. याच रागात घरातील साडीच्या तुकड्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे.
स्थानिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षात कॉल करून भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच सोनिया बेशुद्धावस्थेत मिळून आली. त्यांनी तत्काळ तिला रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. तेव्हा सोनू कुमारने ती पडल्यामुळे डोक्याला लागल्याचे पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा आवळून तिची हत्या केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सोनू कुमारला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्याने गुह्यांची कबुली दिली. याप्रकरणी तिच्या भावाने उस्मान शेखने दिलेली तक्रारीवरून भांडूप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत सोनू कुमारला अटक केली आहे.