Join us

पती आत्महत्या प्रकरण : महिलेसह प्रियकराला जामीन मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 6:34 AM

आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केवळ परिस्थितीजन्य दबाव असणे आवश्यक नाही, तर चिथावणी देण्याची हेतूपूर्ण कृती असावी लागते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

मुंबई : विभक्त पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेली महिला आणि तिच्या प्रियकराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला.

‘प्रथमदर्शनी, मृत व्यक्तीने आत्महत्येसारखे टोक गाठावे, असे कोणतेही पाऊल आरोपींनी उचलले नाही. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे नाहीत,’ असे न्या. आर. एन. लड्ढा यांच्या एकलपीठाने नमूद केले. आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केवळ परिस्थितीजन्य दबाव असणे आवश्यक नाही, तर चिथावणी देण्याची हेतूपूर्ण कृती असावी लागते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पत्नीच्या या वागण्यामुळे पती मानसिक तणावाखाली होता. त्यातून त्याने मे २०२४ मध्ये आत्महत्या केली, असे मृत व्यक्तीच्या वडिलांनी याचिकेत म्हटले आहे.

धमकीबाबत तक्रार दिली होतीआपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे. आपल्या पतीने समजुतीने घटस्फोट घेण्याची तयारी केली होती. त्यानंतर त्याने दिलेली संमती मागे घेतली आणि त्याने स्वत:ला संपविण्याची धमकी दिली होती. याबाबत आपण तक्रार दिली होती, असे संबंधित महिलेने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून महिला आणि तिच्या प्रियकराला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

टॅग्स :उच्च न्यायालय