प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:34 IST2025-03-20T13:33:39+5:302025-03-20T13:34:02+5:30
प्रियकर आणि त्याचा एक साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक
मुंबई : प्रेम संबंधामध्ये अडचण बनलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा प्रकार दिंडोशी पोलिस ठाणे हद्दीत उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली असून, प्रियकर आणि त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
रंजू चंद्रशेखर चौहान (२८) आणि मोइनुद्दीन खान (२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजू ही गोरेगाव पूर्वेकडील हमुलाल सेवा मंडळ बंजारीपाडा परिसरात पती चंद्रशेखर (३६) सोबत राहत होती. १५ मार्च रोजी चंद्रकांत चौहान घरात बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर त्यांचे साडू विजेंद्रकुमार चौहान (५०) यांनी पोलिसांना कळविले.
रुग्णालयात नेल्यानंतर चंद्रशेखरला मृत घोषित करण्यात आल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत्यूमागे घातपाताचा संशय आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बीएनएस कायद्याचे कलम १०३ (१), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
साथीदारांच्या मदतीने गळा आवळून खून
पोलिस चौकशीमध्ये रंजू हिचे शाहरूख नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजले. त्यावरून तांत्रिक तपास केला असता, या प्रेम संबंधामध्ये पती अडचण ठरत असल्याने रंजूने प्रियकर शाहरूख व त्याचा मित्र मोइनुद्दीन, शिवदास यांच्याशी संगनमत करून पतीचा काटा काढण्याचे ठरविले.
त्यानुसार आरोपींनी १५ मार्च रोजी रात्री २:४५ च्या सुमारास गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.