हुश्श! अखेर टॅबला ठाण्यात लाभला मुहूर्त
By admin | Published: April 15, 2016 01:26 AM2016-04-15T01:26:14+5:302016-04-15T01:26:14+5:30
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न अखेर येत्या शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. मागील वर्षभर रखडलेला टॅबचा प्रस्ताव अखेर
ठाणे : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न अखेर येत्या शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. मागील वर्षभर रखडलेला टॅबचा प्रस्ताव अखेर महासभेच्या पटलावर आला असून आता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २ कोटी २९ लाखांची तरतूद केली असून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
डॉ. होमी भाभा टॅब योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करणे, विद्यार्थी पटसंख्या टिकवणे, दर्जेदार शिक्षण देणे, त्यांना जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकवून ठेवणे, वेळ आणि मनुष्यबळ बचत करणे, हा मुख्य उद्देश यामागचा आहे. त्याचप्रमाणे समाजाचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि विद्यार्थी जागतिकीकरणाशी जोडला जाणे, हा हेतू यामागचा असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यानुसार, आठवीच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या हातात येत्या शैक्षणिक वर्षापासून टॅब दिले जाणार आहे. त्यात राज्य शासनाने निश्चित केलेला सर्व बौद्धिक विषयांचा अभ्यासक्र म असणार असून विद्यार्थ्यांना हे टॅब घरी नेता येणार आहेत. (प्रतिनिधी)
मागील दोन महासभांत टॅबचा विषय चांगलाच गाजत होता. माजी महापौर अशोक वैती यांनी तर हा विषय पटलावर घेऊन सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विरोधकांनीदेखील यात आपली पोळी भाजून घेतली होती. अखेर, २० एप्रिलच्या महासभेत हा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे.