हुश्श...परळ टीटीवरून होणार आता ‘विनाअडथळा’ प्रवास; डांबरीकरणाचे काम सुरू तर सपाटीकरणाचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:44 AM2023-12-17T10:44:45+5:302023-12-17T10:44:50+5:30

पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला निर्देश दिले होते आणि डागडुजीचे कामदेखील करण्यास सांगितले होते.

Hush...Paral TT will now be a 'barrier-free' journey; Asphalting work started and leveling work completed | हुश्श...परळ टीटीवरून होणार आता ‘विनाअडथळा’ प्रवास; डांबरीकरणाचे काम सुरू तर सपाटीकरणाचे काम पूर्ण

हुश्श...परळ टीटीवरून होणार आता ‘विनाअडथळा’ प्रवास; डांबरीकरणाचे काम सुरू तर सपाटीकरणाचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दक्षिण मुंबईतील पुलांपैकी एक असलेल्या परळ टिटी उड्डाणपुलावरील सपाटीकरणाचे काम महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाहणी दौऱ्यादरम्यान या पुलाची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने हे काम करण्यात आले आहे. या कामामुळे उड्डाणपुलावरून आता ‘विनाअडथळा’ प्रवास करता येणार असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला निर्देश दिले होते आणि डागडुजीचे कामदेखील करण्यास सांगितले होते. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी परिसर, भायखळा, लालबागनंतर परळ टिटीमार्गे, दादर टिटी, माटुंगा, सायनपासून पुढे पूर्व उपनगरांत जाता येते. त्यादृष्टीने मुंबई शहर ते मुंबई पूर्व उपनगरासाठी परळ टिटी उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जातो. 

पूल होता बंद...
साधारण ४२ हून अधिक वर्षे या पुलाला झाली आहेत. पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पुलाचे सक्षमीकरण होत नाही, तोपर्यंत दुचाकींसाठी हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

पुलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचा कार्यादेश पूल विभागाकडून गेल्या मेमध्येच देण्यात आला आहे. पुलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठी परळ टिटी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी पूल विभागाने मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहतूक नियोजन करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती. त्यानुसार या कामाला गत आठवड्यात सुरुवात झाली. काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहन चालकांनाही अडथळा येत होता. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग सपाटीकरण आणि दुरुस्तीवर भर देण्यात आला.
- उल्हास महाले, 
उपायुक्त, माहिती पायाभूत सुविधा

 अशी केली दुरुस्ती 
दररोज रात्री ९:३० ते सकाळी ७ या कालावधीत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते. पुलावरील रस्त्याच्या दुतर्फा डांबराचा थर बदलण्याचे काम मागील आठवड्यात हाती घेण्यात आले. याअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला २५० मीटर अंतर टप्प्यात डांबर बदलण्यात आले आहे.

परळ टिटी उड्डाणपूल दुरुस्तीच्या पुढच्या टप्प्यात उर्वरित कामे केली जातील. शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर रस्ता वाहन चालकांच्या सेवेत आल्यानंतर परळ टिटी पुलाच्या संपूर्ण कामाला सुरुवात करण्यात येईल, त्यामुळे वाहतूक सुरळीत राहील. या संपूर्ण दुरुस्तीसाठीच्या वाहतूक पोलिस विभागाच्या सर्व परवानग्या पालिकेकडून घेण्यात आल्या होत्या, तशाच त्या आगामी कालावधीत होणाऱ्या मुख्य कामांसाठी मुंबई वाहतूक पोलिस विभागामार्फत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मुख्य कामालाही येत्या काही दिवसांत सुरुवात होईल.
- विवेक कल्याणकर, 
प्रमुख अभियंता (पूल)

Web Title: Hush...Paral TT will now be a 'barrier-free' journey; Asphalting work started and leveling work completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.