हुसैनी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ३३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:14 AM2017-09-02T06:14:19+5:302017-09-02T06:14:24+5:30

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या शुक्रवारी ३३ वर पोहोचली

Hussaini building collapse occurred on 33 | हुसैनी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ३३ वर

हुसैनी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ३३ वर

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या शुक्रवारी ३३ वर पोहोचली. त्यात २१ पुरुष व सात महिला व पाच लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची संख्या एकूण २० असून त्यात अग्निशमन दलाच्या ७ जवानांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर २८ तासांनी शुक्रवारी दुपारी १२.३५ वाजता बचाव कार्य पूर्ण झाले असून शेजारील ‘दावरवाला’ या इमारतीमधील रहिवाशांनाही सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र हलवण्यात आले आहे.
‘हुसैनी’ इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. ‘म्हाडा’ने २०११ मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एनडीआरएफचे
जवान घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले होते. गुरुवारी मध्यरात्री बारावाजेपर्यंत दुर्घटनास्थळावर ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते. तेव्हा मृतांचा आकडा २४ वर होता. मध्यरात्रीनंतर सकाळी दहापर्यंत मृतांची संख्या ३३ वर पोहोचली. तर जखमींची संख्या २० झाली. ३३ मृतांपैकी एकाची ओळख पटणे बाकी आहे. १३ जखमी रहिवाशांपैकी ९ जणांची प्रकृती स्थिर असून, तिघांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. एका जखमीला जेजेमधून सैफीमध्ये हलविण्यात आले आहे.

हुसैनी इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. घटनास्थळावरील काही नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठीही पाठविण्यात आले आहेत.

महापौर-आयुक्तांविरोधात याचिका
हुसैनी इमारतीच्या दुर्घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि म्हाडा अभियंत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका शिवडी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी दिली.

Web Title: Hussaini building collapse occurred on 33

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.