चेतन ननावरेमुंबई : भेंडी बाजारातील दुर्घटनाग्रस्त हुसैनी इमारतीला लागून असलेल्या जुमानी इमारतीचा अर्धा भाग अद्याप धोकादायक अवस्थेत उभा आहे. दुपारी १२.३५ वाजता बचाव पथकाने काम थांबवले. तरी अर्धवट अवस्थेत उभा असलेला ढाचा पाडण्याचे काम अद्याप सुरू आहे. दरम्यान, जुमानी इमारतीला लागून असलेल्या दावरवाला इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना घरांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.हुसैनीच्या दुर्घटनेनंतर दुमजली आणि चार मजली अशा दोन विंगमध्ये विभागलेल्या दावरवाला इमारतीमधील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित जागी हलवण्यात आले. त्यांच्यासोबतच दुसºया बाजूला असलेल्या हारुण मंजिलमधील रहिवाशांनाही इमारत खाली करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी बचाव कार्य थांबवल्यानंतर हारुण मंजिलमधील रहिवासी आपल्या घरांमध्ये राहण्यासाठी गेले आहेत. याउलट दावरवाला इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव घरांत परतण्यात मनाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकेच्या सी वॉर्डचे सहायक आयुक्त जीवक घेगडमल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हुसैनी इमारतीचा ढिगारा उपसल्यानंतर महापालिकेला जुमानी इमारतीचा अर्धवट अवस्थेत उभा असलेला ढाचा पाडण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शुक्रवारीच या कामाला सुरुवात केलेली आहे. या इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्नच नाही. याउलट दावरवाला इमारतीबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. शिवाय त्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सैफी बुºहानी अपलिफमेंट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे महापालिकेला आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत पाडकाम किंवा कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.हुसैनी इमारतीप्रमाणेच दावरवाला इमारतही एसबीयूटी प्रकल्पात समाविष्ट आहे. मात्र त्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्यातरी इमारतीची पाहणी केल्यास इमारतीच्या तळमजल्याला टेकू लावण्यात आले आहेत. तर वरील मजल्यांना भेगा पडल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे प्रशासन सक्तीने या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करणार की पुन्हा एकदा हुसैनीची पुनरावृत्ती पाहणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.पाणीपुरवठा पूर्ववतहुसैनीच्या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव हारुण मंजिल इमारतीमधील रहिवाशांना इमारतीबाहेर काढले होते. त्यांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र शुक्रवारी बचावकार्य थांबल्यानंतर वीजपुरवठ्यासह पाणीपुरवठाही पूर्ववत सुरू करण्यात आला. दरम्यान, कालच्या दुर्घटनेत फुटलेल्या मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.जिवापेक्षा सामानाची जास्त पर्वाहुसैनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर वाचलेले रहिवासी आणि त्यांच्या नातेवाइकांनी उरलेसुरले सामान गोळा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती.जेसीबीने ढिगारा उपसतानाच नातेवाईक घटनास्थळावर आणि ढिगारा टाकत असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या विरोधाला झुगारून काही प्रमाणात सामानाची जमवाजमव करत होते.त्यात शुक्रवारी बचाव कार्य थांबल्यानंतर मोठ्या संख्येने रहिवाशांच्या नातेवाइकांनी सामान गोळा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या जुमानी इमारतीच्या भागाला खेटूनच तांबे आणि चांदीची भांडी पडलेली होती. मात्र जिवाची पर्वा न करता नातेवाईक भांडी गोळा करताना दिसले.अन् कपाटामुळेजीव वाचला !इमारत कोसळण्यापूर्वीच काही मिनिटांपूर्वी रोजच्या प्रमाणेच कामावर रुजू झालो होतो. ज्या वेळी इमारत कोसळायला लागली, त्या वेळी आजूबाजूला काय सुरू आहे ते कळलेच नाही. खूप मोठा आवाज आला आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, तीच इमारत कोसळत असल्याचे लक्षात आले.त्या वेळी काय करावे हे सुचतच नव्हते. गोडाऊनमध्येच पळापळ सुरू असताना कपाटाजवळ पोहोचताच इमारतीचा वरच्या स्लॅपचा मोठा भाग कोसळणार तितक्यात कपाट आडवे आल्याने बचावलो. याच कपाटाच्या आडोशामुळे ढिगाºयाखाली तग धरू शकलो, त्यानेच जीव वाचविल्याचे भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील अब्दुल सांगत होता.हुसैनी इमारत पत्त्यासारखी खाली कोसळत असताना, खाली गोडाऊनमधल्या कपाटामुळे २५ वर्षीय तरुणाचा जीव वाचला. तीन तासांनंतर तो ढिगाºयातून बाहेर आला. अब्दुल लतिफ खान हा तरुण जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अब्दुल, याच इमारतीमधील तळ मजल्यावरील गोडाऊनमध्ये गेली आठ वर्षे काम करीत होता.
हुसैनीच्या ‘धक्क्याने’ दावरवाला रिकामी, रहिवाशांना घराबाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:01 AM